शहादा । दि.11 । ता.प्र.- पाटबंधारे विभागाच्या पाटचारीवर शहराच्या भाजी मार्केटलगत अतिक्रमण करूण वसलेल्या कुंटणखाना परिसरावर अखेर प्रशासनाचा हातोडा चालल्याने 40 घरे जमिनदोस्त करण्यात आली.
पोलीसांच्या फौजफाट्यासह काढण्यात आलेल्या अतिक्रमण निर्मुलन मोहिमेचे नागरीकांनी स्वागत केले असून या जागेवर पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याबाबत पोलसप्रशासन, पालिका प्रशासन व पाटबंधारे विभागाने खबरदारी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शहादा शहरात डोगंरगाव रोड मार्गे भाजीमार्केट ते थेट सालदारनगर भाग तसेच लोणखेडा बायपास रोडमार्गे पुन्हा मोहिदा रोड, सप्तश्रुंगी माता मदिरालगत, प्रकाशा रोडपासून शिरूड चौफुली असे अनुक्रमे सुमारे तीन व दोन अशी पाच किलोमीटर लांबीची पाटचारी गेलेली आहे.

या पाटचारीवर कच्चा व पक्का स्वरूपाची बांधकाम करून अतिक्रमणे करण्यात आलेली आहेत . दरम्यान, 20 वर्षानंतर पालिका प्रशासनाने पाटचार्‍यांमधील गाळ काढून खोलीकरण केले आहे. मात्र, अतिक्रमण झाल्यामुळे काही ठिकाणी पाटचार्‍याांमधील खोलीकरण रखडले आहे. पाटचार्‍यांवरील बेकायदेशीर पणे झालेले अतिक्रमण काढण्याबाबत वृत्तपत्र, स्वाभीमानी शेतकरी संघटनेनेही मागणी लावून धरली होती.

शहरातील भाजीमार्केटलगत गेलेल्या मोठ्या पाटचारीवर देखील पक्कया स्वरूपाचे बांधकाम करून अतिक्रमण झालेले आहे.

अतिक्रमण करून वसलेला हा कुंटणखाणा शहराचे नाव कुप्रसिध्द करीत असल्याने हे अतिक्रमण काढण्याची वारंवार मागणी केली जात होती.

अतिक्रमण झालेल्या कुंटणखाण्यातील घरे काहींनी भाडेतत्वावर देवून राजरोसपणे देहविक्रीचा व्यवसाय या ठिकाणी सुरू केला होता. त्यामुळे पाटबंधारे विभागाने 46 अतिक्रमण काढण्याबाबत नोटीसा बजावल्या होत्या.

तरीही अतिक्रमण हटविण्यात आले नव्हते. अखेर पाटबंधारे विभागाने पाटचारीवर वसलेल अतिक्रमीत कुंटणखाना काढण्यासाठी अतिक्रमण मोहिम राबविली.

दोन जेसीबी मशिनव्दारे अखेर अतिक्रमणावर हातोडा चालवण्यात आला. यावेळी पोलीसांच मोठा फौजफाटा तैनात होता. अतिक्रमण काढण्यासाठी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता के.एस. बांगर, पी.जी.पाटील, तहसिलदार मनोज खैरनार, शाखा अभियंता गौरव गोसावी, एस.पी.गावंडे, आर.जी.चौधरी, पोलिस निरिक्षक शिवाजी बुधवंत, सपोनी ज्ञानेश्वर बडगुजर यांच्यासह शहादा, सारंगखेडा व म्हसावद पोलीसांचा फौजफाटा तैनात होता.

46 पैकी 40 अतिक्रमणे काढण्यात आली. तर सहा अतिक्रमणे पाटचारी हद्दीत येत नसल्याने त्यांना अभय देण्यात आले.
कुंटणखाना परिसरातील अतिक्रमणे काढण्यासाठी सकाळी 10 वाजेच्या सुमारास गेलेल्या पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांशी अतिक्रमणधारकांनी वाद घालत खोडा घालण्याचा प्रयत्न केला.

मात्र, अधिकारी व पोलीस प्रशासन भुमिकेवर ठाम राहिल्याने या परिसरातील वर्षानुवर्ष असलेले अतिक्रमण जमिनदोस्त करण्यात आले. अतिक्रमण काढण्यापुर्वी वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांनी सर्वच घरांचे वीजमीटर काढले.

अतिक्रमण काढण्यापुर्वी कुटंणखान्यातील सर्वच घरांना कुलूप होते. तरीही प्रशासनाने अतिक्रमणे जमिनदोस्त केल्यानंतर या घरांमधील पत्रे, पंखे, कुलर, फ्रीज व संसारोपयोगी वस्तू काहींनी संधी साधत लंपास केल्या.

दरम्यान, अतिक्रमीत कुंटनखान्यातील काही घरे वातानुकुलीत होती. प्रत्येक घरांमध्ये तीन ते चार कप्पे करण्यात आले होते. या कुंटणखान्यामुळे शहराचे नाव बदनामीच्या उंबरठ्यावर पोहोचले होते.

त्यामुळे हे अतिक्रमण जमिनदोस्त केल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे. अतिक्रमण निर्मुलन मोहिम सुरू असताना नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

 

LEAVE A REPLY

*