नंदुरबार । दि.11 । प्रतिनिधी-नंदुरबार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत आज अनुपस्थित खाते प्रमुखांची चांगलीच झाडाझडती घेण्यात आली.
आजच्या स्थायी सभेला सात खात्यांचे प्रमुख असलेले अधिकारी वेगवेगळया कारणांनी अनुपस्थित होते. परंतु यापैकी कोणीही जि.प. अध्यक्षांची पुर्व परवानगी घेतलेली नव्हती.
त्याचबरोबर स्थायी समितीच्या 14 सदस्यांपैकी फक्त सहा सदस्य सभेला उपस्थित होते. त्यामुळे आजची सभा अधिकार्‍यांच्या गैरहजरीमुळे चांगलीच गाजली.

या सभेला जि.प. अध्यक्षा सौ.रजनी नाईक, उपाध्यक्ष सुहास नाईक, सभापती आत्माराम बागले, लताबाई पाडवी, सदस्य रतन खात्र्या पाडवी, सिताराम राऊत हे सदस्य उपस्थित होते.

प्रभारी मुख्यकारी अधिकारी डी.एम.मोहन व उपमुख्यकार्यकारी अधिकारी सारीका बारी, सभेला उपस्थित होते. खातेप्रमुखांपैकी सात खातेप्रमुख शासनाच्या वेगवेगळया ठिकाणी असलेल्या बैठकांमुळे अनुपस्थित होते.

परंतु त्यांनी 10 दिवस अजेंडा आधी देवून सुध्दा जि.प.अध्यक्षांना पुर्व कल्पना दिलेली नव्हती. त्यामुळे यासर्वांना नोटीस देण्यात यावी.

अशी सूचना जि.प.अध्यक्षांनी प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकार्‍यांना केली. सभेमध्ये एकूण 8 विषयांवर चर्चा करण्यात आली.

हे सर्व विषय तांत्रिक स्वरूपाचे असल्याने त्यावर चर्चा करण्यात आली. त्यात प्रामुख्याने धडगांव तालुक्यात अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षक अद्यापही कामावर हजर नसल्याचे जि.प.उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी प्राथमिक उपशिक्षणाकारी राहुल चौधरी यांना सांगितले तसेच जिल्ह्यातील 445 शिक्षकांच्या जागा रिक्त असून त्याबाबत कोणती कारवाई केली असा प्रश्न रतन पाडवी यांनी मागील सभेमध्ये उपस्थितीत केला होता.

परंतु त्यावर शिक्षणाधिकार्‍यांनी कुठलाही चौकशी अहवाल अद्यापावेतो सादर केलेला नव्हता. त्यामुळे सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

धडगांव तालुक्यातील मांडयापाडा येथे नियुक्त शिक्षक एप्रिलपासून कामावर हजर नसून शाळेचे दप्तर देखील सोबत घेवून गेलेला आहे.

त्याच्यावर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी यावेळी सदस्यानी केली. सर्व खात्यांचा विषयवार आढावा यावेळी घेण्यात आला.

 

 

LEAVE A REPLY

*