बोगस आदिवासींना सेवेतून तत्काळ बडतर्फ करा !

0

नंदुरबार । दि.09 । प्रतिनिधी-महाराष्ट्रात 1 लाख बोगस आदिवासी प्रमाणपत्र घेवून आदिवासींच्या आरक्षणातील जागा बळकावले असून सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना तत्काळ सेवेतून कमी करावे, अशी मागणी महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राजेश वळवी यांनी आज आदिवासी गौरव दिनाच्या कार्यक्रमात बोलतांना केली. आदिवासी गौरव दिनाच्या मुख्य जाहीर सभेचे प्रास्ताविक डॉ.राजेश वळवी यांनी केले.

आदिवासी समाजाच्या हक्काच्या संरक्षणासाठी विश्व आदिवासी गौरव दिवस साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने हजारो आदिवासी बांधव एकत्र येतात. त्याला आता उत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

परंतू केवळ इथेच न थांबता आदिवासींच्या मुलभूत प्रश्नांसाठी सर्व समाजाने एकत्र लढा देण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

राजस्थान येथील आदिवासी समाजाचे अभ्यासक मानसिंग गरासिया यांचे प्रमुख भाषण यावेळी झाले. आदिवासींची ओळख राखण्यासाठी 2006 पासून विश्व आदिवासी गौरव दिन युनोच्या ठरावानुसार साजरा केला जात आहे.

आदिवासी समाजातील तरूण मोठ्या प्रमाणावर या सर्व कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होतात, परंतू त्यांच्या भर केवळ नाच-गाण्यांवरच राहतो.

त्याबरोबरच आपली संस्कृती, आपल्या समाजाच्या मुलभूत समस्या या सर्वांचा अभ्यास आदिवासी समाजातील युवकांनी करण्याची नितांत गरज आहे. आदिवासी समाजाची उत्पत्ती आणि आदिवासी शब्दाची उत्पत्ती याबाबत त्यांनी आपल्या भाषणात सखोल विवेचन केले.

आदिवासी समाज हा ह्या देशाच्या निर्मितीपासूनच आहे, तर आदिवासी शब्द हा त्यानंतर वापरला गेला आहे. या सर्व गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे. आदिवासी समाजाच्या परंपरा, संस्कृती, पुजा-पद्धती ही आपली ओळख आहे. ती विसरता कामा नये, असेही आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले.

काही समाजातील लोक, आदिवासींची ओळख नष्ट करू पाहत आहेत. यासाठी सर्वांनी अभ्यास करण्याची गरज आहे. या जाहीर सभेचा समारोप आदिवासी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.भरत वळवी यांनी केला. हा कार्यक्रम आदिवासींमधील सर्व समाजातील लोकांनी येवून यशस्वी केला. याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार मानले.

या जाहीर सभेमध्ये काही प्रमुख मागण्यांचे ठराव करण्यात आले. ते असे, पेसा कायद्याची अंमलबजावणी तत्काळ करण्यात यावी. आदिवासी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती सप्टेंबर-ऑक्टोबरच्या आत मंजूर करावी. आदिवासी वसतीगृहातील प्रवेश प्रक्रिया निकालानंतर 15 दिवसाच्या आत सुरू करावी.

आश्रमशाळेतील शिक्षक-शिक्षकेतरांची रिक्त पदे त्वरीत भरावीत. शासकीय आश्रमशाळा वसतीगृहांची बांधकामे नियोजीत आराखड्याप्रमाणे करावी व मोडकळीस आलेल्या इमारती तत्काळ दुरूस्त कराव्यात. शासकीय, निमशासकी संस्था, अल्पसंख्यांक संस्था यांमधील भर्ती प्रक्रियेतील कंत्राटी पद्धत बंद करण्यात येवून रोष्टर पद्धतीने भर्ती करावी.

आदिवासी विकास विभागाकडील शेतकर्‍यांच्या कर्जमाफीकरीता वर्ग करण्यात आलेल्या 1 हजार कोटी रुपयांतून महाराष्ट्रातील संपूर्ण आदिवासी शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करावा. विश्व आदिवासी दिवस देशपातळीवर साजरा करण्यात यावा.

सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानुसार बोगस आदिवासींना तत्काळ सरकारी नोकरीतून बडतर्फ करावे. अनुसूची 5 व 6 यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी. घटना समितीचे सदस्य जयपालसिंह मुंडा यांना भारतरत्न देण्यात यावे. तापी नदीवरील हातोडा पुलाला संत गुलाम महाराज यांचे नांव देण्यात यावे.

पेसा कायदा अंतर्गत महाराष्ट्रातील 27 तहसीलमधील ज्या महसुल गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यासाठी 1971 ते 1981 जणगणनेतील गावांचा समावेश करण्यात यावा. अनुसूचित जाती-जमाती कायद्यानुसार वनजमिन खेडूतांना जलदगतीने वनहक्क मान्य करून सातबारा देण्यात यावा.

पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या उभारणीसाठी सुझलॉन वेस्टर्न आणि मायकॉन कंपन्यांना आदिवासी जनहितार्थ केलेल्या मागणीची पूर्तता करण्यात यावी. आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीर बळकवणार्‍यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी. शबरी वित्त महामंडळाला दरवर्षी 500 कोटींचा निधी देण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राध्यापक भिमसिंग वळवी यांनी केले. कार्यक्रमाला बस्तीराम पाडवी यांनी रोडाली गिते सादर केली. नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थीनींनी आदिवासी नृत्य सादर केले.

कार्यक्रमाला डॉ.राजेश वसावे, बटेसिंग वसावे, कुणाल वसावे, विरेंद्र वळवी, राजेंद्र पवार, वासुदेव बागुल, कैलास पाडवी, सुनिल गावीत यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*