बुधावली ते सोमावल रस्त्याची पहिल्या पावसातच लागली वाट

0
मोदलपाडा ता. तळोदा । दि.09 । वार्ताहर-अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावर महिन्याभरापूर्वी नुतनीकरण करण्यात आलेल्या बुधावली ते सोमावल दरम्यानच्या रस्त्यावर पहिल्याच पावसाळ्यात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
हे खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. रस्त्याच्या निष्कृष्ठ कामामुळे अवघ्या दीड ते दोन महिन्यांच्या कालावधीत रस्त्यावरील खड्डे पडल्यामुळे सदर ठेकेदाराच्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्रस्त वाहनधारकांनी केली.
गेल्या वर्षभरापासून अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्यमार्गावरील तळोदा ते सोमावल पर्यतच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाली होती. अवघे आठ ते दहा किमी अंतर पार करतांना वाहनधारकांचे नाकीनऊ येत होते.

त्यामुळे संबंधित विभागाने राज्यमार्गारील महाराष्ट्र हद्दीतील बुधावली ते सोमावलपर्यतच्या रस्त्याचे संपूर्ण नूतनीकरण केले. मागील दोन महिन्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्णत्वास आले होते.

पावसाळ्यापूर्वी खड्डेमय रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी व वाहनधारकानी समाधान व्यक्त केले.म ात्र त्यांचे हे समाधान दीर्घ काळ टिकू शकले नाही.

यावर्षीच्या पहिल्याच पावसाळ्यात या नूतनीकरण करण्यात आलेल्या रस्त्याला मोठमोठे खड्डे गेले आहेत. जून महिन्यात दुसर्‍या पंधरवाड्यात झालेल्या पावसातच या रस्त्यावर खड्डे तयार व्हायला लागले होते.

त्यांनतर संपूर्ण जुलै महिन्यात संततधार सुरु असलेल्या पावसामुळे नूतनीकरण करण्यात आलेल्या हा रस्त्याचे पूर्ण पणे बारा वाजले असून रस्त्यावर पूर्णपणे खड्डयाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

पहिल्याच पावसात रस्त्याला पडलेल्या खड्ड्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दिवस-रात्र या महामार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.

वाहनाची वर्दळ व या मार्गाचे महत्व लक्षात घेता या राज्य महामार्गावरील तळोदा ते अंकलेश्वरचा भाग साक्री-शेवाळी ते अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट करण्यात आल्याने नूतनीकरण करण्यात आलेला बुधावली ते सोमावल पर्यंतचा रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जाचा आहे.

राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा असतांना रस्त्याचे अश्याप्रकारे निष्कृष्ठ दर्जाचे काम झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा असणार्‍या रस्त्याच्या कामाबाबत असे घडत असेल तर ग्रामीण व दुर्गम-अतिदुर्गम भागातील रस्त्याच्या कामांची काय अवस्था असेल, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

सुमारे दोन महिन्याभरापूर्वी नूतनीकरण करण्यात आलेल्या रस्त्याला खड्डे गेल्याने रस्त्याचा कामाबाबत माहिती विचारण्यासाठी तळोदा बांधकाम विभागाशी संपर्क केला असता,हा रस्ता आता राष्टीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आल्याने याबाबत आम्ही माहिती देऊ शकत नसल्याचे सांगण्यात आले.

मागील दिड महिन्यापासून रस्त्याला मोठं-मोठे खड्डे पडले आहेत.नवीन रस्त्याची हि दैनावस्था व नागरिकांचा रोष लक्षात घेता काल व आज पाऊस काही तास थांबताच संबधित विभागकडून रस्त्यावरील हे खड्डे बुजविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आलेत.

माहिन्याभरापूर्वी देखील याच रस्त्याला पडलेले खड्डे बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला,परंतु पुन्हा पाऊस सुरु झाल्याने त्याचा हा प्रयत्न फसला व पुन्हा नव्याने या रस्त्यावर खड्डे निर्माण झालेत.

रस्त्याचे नूतनीकरण करतांनाच जर गुणवत्ता राखली गेली असती तर अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीत या रस्त्यावरील खड्डे दोनदा बुजविण्याची नामुष्की प्रशासनावर आली नसती,चर्चा आता केली जात आहे.

आमदारांच्या गावाला जोडणारा रस्ता
तळोदा तालुक्यातील सोमावल हे शहादा-तळोदा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आमदार उदेसिंग पाडवी यांचे मूळ गाव असून तळोद्याहून त्यांच्या मूळ गावी येतांना-जातांना याच मार्गाचा अवलंब करावा लागतो.विद्यमान आमदाराच्या गावाला जोडणार्‍या राज्य महामार्गावरील बुधावली ते सोमावल दरम्यान रस्त्याचे करण्यात आलेले नूतनिकरण एवढ्या निष्कृष्ठ दर्जाचे कसे होऊ शकते,याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.रस्ता तयार करणार्‍या प्रशासनाला व ठेकेदाराला आपण आमदाराच्या गावाला जोडणारा रस्ता बनवीत आहोत,याची जराची कल्पना नसावी का? किंवा त्यांना निष्कृठ दर्जाचा रस्ता बनविताना लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांची जराही भीती वाटली नसावी?असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण केले जात आहेत.अवघ्या दोन महिन्यात बारा वाजल्याने पारदर्शी व भ्रष्टाचार मुक्त शासन-प्रशासनाचा आग्रह धरणार्‍या भाजपाचे आमदार या रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबाबत कोणती भूमिका घेतात,हे पाहणे आता औत्सक्याचे ठरणार आहे.

 

LEAVE A REPLY

*