वनक्षेत्रातील अतिक्रमीत पीकपेरणी नष्ट : शहादा व नंदुरबार वनविभागाची कारवाई

0

शहादा । दि.5 । ता.प्र.-शहादा तालुक्यातील शहाणा, कोळपांढरी, मालगाव, नवानगर आदी गावांमधील वन जमिनीवर 20 हेक्टर क्षेत्रावर करण्यात आलेली अतिक्रमीत पिक पेरणी वनविभागाने नष्ट केली आहे.

आदिवासी ग्रामीण भागातील आदिवासी खेडत असलेल्या जमिनीवरील पिक पेरा नष्ट करण्यासाठी वन विभाग, महसूल व पोलीस प्रशासनाचा फौजफाटा उपस्थित होता.

नंदुरबार वन विभाग, शहादा वन विभाग, उपवनसंरक्षक पियुषा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा, तोरणमाळ, धडगाव, काकर्दासह वन क्षेत्रांतर्गत वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करून पिक पेरा करणार्‍या जमिनीवरील अतिक्रमण हटाव मोहीम सुरु करण्यात आली आहे.

सहाय्यक वनसंरक्षक पी.पी. सूर्यवंशी, धडगाव सहाय्यक वनसंरक्षक एस.आर. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तसेच वनक्षेत्रपाल अनिल पवार (शहादा ), शिवाजी रत्नपारखे (बिलगाव), पी.बी. पठाण (काकर्दा), व्ही.जे. पुरी (धडगाव), एम.व्ही. फुलपगारे ( तोरणमाळ) तसेच महसूल विभागाचे प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार मनोज खैरनार, नायब तहसीलदार डॉ.उल्हास देवरे, शहादा उप विभागीय पोलीस अधिकारी एम.बी. पाटील, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, मंदाणे मंडळ अधिकारी जे.टी. गिरासे, राज्य राखीव पोलीस दलाचे एक प्लाटून, वन विभागाचे माजी सैनिक, वन मजूर, पोलीस कुमक असा एकूण 180 ते 190 अधिकारी, कर्मचारी यांच्या ताफ्यासह शहाणा, कोळपांढरी, मालगाव, नवानगर, या भागातील 20 हेक्टर म्हणजे सरासरी 50 एकर जमिनीत पिक पेरा नष्ट करण्यात आला आहे.

वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केलेल्या व्यक्तींनी पिक पेरा केलेला होता, तो संपूर्ण नष्ट केला आहे. यावेळी झालेली कारवाई सर्वात मोठी होती. यापुढे देखील सुरूच राहणार असल्याचे सहाय्यक वन उपवनसंरक्षक पी.पी.सुर्यवंशी यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*