लोकनेते बटेसिंह रघुवंशी उद्यानाचे 13 ला उद्घाटन

0
नंदुरबार । दि.05 । प्रतिनिधी-येथील नगरपालिका अंतर्गत लोकनेते दादासाहेब बटेसिंह रघुवंशी उद्यान, आरोग्य सुविधा केंद्र, डॉ.एपीजे अब्दुल कलाम ई-लायब्ररीचे उद्घाटन दि. 13 ऑगस्ट रोजी राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आ.रघुवंशी म्हणाले, गेल्या पंचवार्षिक निवडणूकीत दिलेल्या सर्व आश्वासनांची पुर्तता करण्यात आली आहे. उर्वरित कामांचा शुभारंभ निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापुर्वी करण्याचा मानस आहे.
दि. 13 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता आरोग्य सुविधा केंद्राचे उद्घाटन नगरपालिकेच्या इमारतीत करण्यात येणार आहे. या आरोग्य सुविधा केंद्रात अत्यंत माफक दरात सोनोग्राफी, एक्स रे, ईसीजीची सुविधा असणार आहे.

11.15 वाजता लोकनेते दादासाहेब बटेसिंह रघुवंशी कॉम्लेक्समध्ये डॉ.एपीजे अब्दुल कलाम ई-लायब्ररीचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

या दोन्ही कामांचे उद्घाटन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील उपस्थित राहणार आहेत.

सकाळी 11.30 वाजता नाटय मंदिराशेजारील लोकनेते दादासाहेब बटेसिंह रघुवंशी उद्यान तसेच नाटय मंदिरात सुवर्ण जयंती योजनेंतर्गत शिलाई मशिन, ब्युटीपार्लर खुर्ची आदी साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

दोन्ही कार्यक्रमांचे उद्घाटन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत.

प्रमुख पाहुणे म्हणून माजी खा.माणिकराव गावीत, आ.सुरुपसिंग नाईक, आ.अमरिश पटेल, आ.कुणाल पाटील, आ.के.सी.पाडवी, माजीमंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, आ.डी.एस.अहिरे, आ.काशिराम पावरा, आ.सुधीर तांबे, आ.चंद्रकांत रघुवंशी, जि.प.अध्यक्षा सौ.रजनी नाईक, सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, जि.प.उपाध्यक्ष सुहास नाईक, बांधकाम सभापती दत्तू चौरे, तळोदा पालिका गटनेते भरत माळी, पंचायत समिती सभापती रंजना नाईक, बाजार समितीचे सभापती भरत पटेल, शेतकरी संघाचे अध्यक्ष बी.के.पाटील उपस्थित राहणार आहेत, असेही आ.रघुवंशी म्हणाले.

200 रुपयात सोनोग्राफी
पालिकेने उभारलेल्या आरोग्य सुविधा केंद्रात सोनोग्राफीची सोय केली जाणार आहे. अत्यंत माफक अशा केवळ 200 रुपयात सोनोग्राफी करुन देण्यात येणार आहे. याशिवाय डीजीटल एक्स रे, ईसीजीची सुविधाही या आरोग्य सुविधा केंद्रात राहणार आहे. ईसीजी केवळ 50 रुपयांत करुन मिळणार आहे.

पेवर ब्लॉकवर चालणार तीन डब्यांची रेल्वे
दादासाहेब बटेसिंह रघुवंशी उद्यानात तीन डब्यांची रेल्वे राहणार असून ती उद्यानातील पेवर ब्लॉकवरच चालणार आहे. तसेच विविध खेळणे, म्युझिकल फाऊंटनही राहणार आहे. यशिवाय सेल्फी पॉईंटही उभारण्यात आला आहे.

30 गरीबांना निवारा
नंदुरबार शहरात फुटपाथवर राहणार्‍या, ज्यांना राहण्यासाठी घरे नाही, निवारा नाही अशा 30 गरीबांचा सर्व्हे करण्यात आला आहे. या 30 जणांना जुन्या कोहिनूर चित्र मंदिराजवळ असणार्‍या अहिल्याबाई होळकर सभागृहात निवार्‍याची सोय करण्यात आली असून त्यांना नवीन कपडे, चांगल्या दर्जाची गादी, पांघरुण तसेच जेवणही दिले जाणार आहे. त्यामुळे या गरीबांचीदेखील सोय पालिका करणार आहे.

सप्टेंबर महिन्यात ट्रक टर्मिनलचे उद्घाटन
येथील स्व.विलासराव देशमुख ट्रक टर्मिनलचे येत्या सप्टेंबर महिन्यात उद्घाटन करण्यात येणार आहे. या उद्घाटन सोहळयाला कै.देशमुख यांचे पूत्र आ.अमित देशमुख, सिने अभिनेता रितेश देशमुख तसेच उन्हास पवार हे उपस्थित राहणार आहेत, असेही आ.रघुवंशी म्हणाले.

 

LEAVE A REPLY

*