गुजरात हद्दीतील पुलांवर खड्ड्यांचे साम्राज्य

0
मोदलपाडा । दि.19 । वार्ताहर-अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य महामार्गावरील श्री कृष्णा खांडसरी ते आश्रावा दरम्यानच्या गुजरात राज्याच्या हद्दीतील पुलांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
पुलावरील खड्ड्यातून वाहने पास करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
मध्यप्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या तीन राज्यांना जोडणारा अंकलेश्वर-बर्‍हाणपूर हा आंतरराज्य महामार्ग असून दिवसभर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ असते.
ओव्हरलोड व बेशिस्त वाहतूक, अपघात यासारख्या विविध समस्यांमुळे हा महामार्ग नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. आता या महामार्गावरील गुजरात हद्दीतील पुलांवर निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.

या महामार्गावरील तळोदा ते अक्कलकुवा दरम्यानचा साधारणतः श्री कृष्णा खांडसरी ते आश्रावापर्यंतचा भाग हा गुजरात हद्दीत येतो.

या भागात गुजरात हद्दीतील सुमारे तीन पूल येतात.या तीनही पुलांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. यातील श्री कृष्णा खांडसरी जवळची पुलाची तर खड्ड्यामुळे बिकट अवस्था झाली आहे.

मागील पंधरवाड्यात झालेल्या पावसामुळे या खड्ड्याची खोली व संख्या अधिकच वाढली आहे. हा पूल चढावावर असल्याने या पुलांवरील खड्डे सहसा लक्षात येत नाही.

त्यामुळे भरधाव येणारे वाहने अचानक खड्डयात आदळली जात असल्याचे प्रकार घडत आहेत. या पुलांवर अर्धा ते एक फुटाचे खड्डे पडले आहेत. सर्वत्र खड्डेचखड्डे असून वाहन नेमके काढायचे कुठून हा प्रश्न वाहनचालकांपुढे निर्माण होतो.

अनेक ठिकणी पुलाचा स्लॅब उखडून लोखंडी सळयांवरती आल्या आहेत. पुलांरून वाहन पास करत असतांना त्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.

पावसामुळे या पुलांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचते. दोन वाहने पास होत असतांना एका वाहनाचे चाक जोराने खड्ड्यात आदळले गेल्यास खड्ड्यात साचलेले पाणी हे दुसर्‍या वाहनचालकांवर उडण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत.

त्यामुळे अनेकदा वाहनधारकांमध्ये वादावादी निर्माण होतात. याचा सर्वाधिक त्रास हा दुचाकीस्वारांना सहन करावा लागत आहे.

तीन-चार दिवसांपूर्वी खांडसरी नजीकच्या या पुलावरील खड्डे बुजवण्याचा तकलादू व अयशस्वी प्रयत्न संबंधित विभागाकडून करण्यात आला.

परंतु या प्रयत्न वाहन धारकांची डोकेदुखी वाढवणारा ठरला आहे.खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य निष्कृष्ट दर्जाचे असल्याचे अनेकांनी सांगितले.

त्यामुळे खड्डे बजावले न जाता ते पुलावर चिखल निर्माण करण्यास कारणीभूत ठरले आहे.खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्यामुळे पुलावर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला आहे.

वाहनासोबत वाहनचालकदेखील चिखलाने भरू लागले आहेत.हा चिखल पुलावर व रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरला जाऊन दुचाकी स्लिप होण्याचे प्रकार वाढले आहेत.

तळोदा ते सोमावल दरम्यानच्या गुजरात हद्दीतील पुलांचीच नाही तर रस्त्याचीदेखील मोठ्या प्रमाणावर दूरवस्था झाली आहे.

आश्रावा गावानजीक रस्त्याला मोठया प्रमाणात खड्डे पडले आहेत.एकंदरीतच गुजरात राज्यातील रस्त्याला व पुलाला पडलेले खड्डे हे अपघातास निमंत्रण देत असून दोन्ही राज्याच्या प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

 

LEAVE A REPLY

*