तर्‍हावद येथील पुराच्या प्रवाह बदलण्यासाठी उपाययोजनेची गरज

0

संजय पाटील,वैजाली ता.शहादा । दि.17-येथून जवळच असलेल्या तळोदा तालुक्यातील तर्‍हावद पुनर्वसन वसाहत दरवर्षी पुराच्या पाण्याखाली जात असल्याने येथील रहिवाशांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होत असल्याने येणार्‍या पुराच्या पाण्याच्या प्रवाह बदलण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याची मागणी येथील प्रकल्प बाधितांनी केली आहे.

तर्‍हावद (ता.तळोदा) येथे वैजाली ते आमलाड रस्त्यालगत सरदार सरोवर प्रकल्पबाधीतांसाठी 2004-05 पासून या ठिकाणी वसाहत बांधण्यात आलेली असून दरवर्षी या बाधितांना किरकोळ पावसामुळे येणार्‍या पुराच्या पाण्याचा सामना करावा लागतो.

2006 पासून वसाहतीच्या उत्तरेस असलेल्या खरवड गावालगतच्या नाल्याला येणार्‍या पुराच्या पाण्याचा प्रवाह बाधितांसाठी धोकेदायक ठरत असतो.

दि.4 जुलैच्या मध्यरात्री याच महिन्यात तर्‍हावद पुनर्वसन वसाहत पूर्णपणे पुराच्या पाण्याखाली गेल्याने पुराच्या पाण्यात अनेकांचे संसार वाहून गेलेत.

प्रकल्पबाधीत म्हणून विस्थापितांचे जीवन जगणार्‍या येथील रहिवाशांनी यापुर्वीसुध्दा अशी नैसर्गिक आपत्ती अनुभवलेली आहे. त्यांच्या अनुभवावरून प्रशासनाने याबाबत कुठलीही उपाययोजना न केल्याने दरवर्षी जैसे थे परिस्थितीचा अनुभव येथील रहिवाशांना येत आहे.

सातपुडा पर्वत भागात उगम पावणार्‍या खरवड गावालगतचा नाला येथील रहिवाशांसाठी डोकेदुखी ठरत असून पावसाळयात पर्वत भागात व परिसरात केव्हाही पाऊस झाल्यास पूर आल्यावर पुराचे पाणी वेगाने येवून सपाटीच्या गावासह या वसाहतीत शिरते बोरद व खरवड या दोन्ही गावांच्या शिवारमधून वाहणार्‍या या नाल्यामुळे व त्यास येणार्‍या पुरामुळे शेतकर्‍यांच्या शेतजमिनी शेतातील लागवड व पेरणी केलेली उभी पिके यांचे दरवर्षी प्रचंड प्रमाणात नुकसान होते.

यावर्षी चालू महिन्यात ऊस, कापूस, मका, केळी, ज्वारी, सोयाबीन पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान होवून शेतातील मातीदेखील वाहून गेलेली आहे.

नैसर्गिक प्रवाहापासून वेगळया झालेल्या या नाल्याचा योग्य दिशेने प्रवाह शोधून त्याला मार्ग दाखवण्याची जबाबदारी शासनाची असून दरवर्षी नाल्याला पुूर आल्यानंतर पुनर्वसन वसाहतील घराघरात पुराचे पाणी जाते.

नंतर शासन पंचनामा करून पुरग्रस्तांना अन्नधान्य जीवनावश्यक वस्तु व रेाख स्वरूपात रक्कम वाटप करतात. हे नित्याचेच झालेले असून प्रशासनाने एकाचवेळा जलयुक्त शिवार योजना अथवा इतर योजनेतून या नाल्याच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह वळवीला तर सर्वांसाठी सोयीचे होणार असून प्रशासनाचीही धावपळ थांबणार आहे.

तळोदा तालुकयातील निझरा नदीवर धनपूर गावाजवळ धरणाचे काम सुरू झालेले असून या नदीमुळे व येणार्‍या पुरामुळे बोरद, मोड, तर्‍हावद, खेडले, खरवड, आष्टे या गावांमधील शेतकर्‍यांच्या शेतांचे व पिकांचे दरवर्षी मोठया प्रमाणात नुकसान होत असते.

मात्र धरण पूर्ण झाल्यास आता या नदीला येणार्‍या पुरामुळे काही प्रमाणात अकुंश बसणार आहे. सातपुडा पर्वतभागातून येणार्‍या परिसरातील छोटया, मोठया नाल्यांच्या प्रवाहाची योग्य दिशा ठरवून त्यांचे थेट नदी पात्रापर्यंत खोलीकरण करणे गरजेचे आहे.

गेल्या दहा ते बारा वर्षापासून याकडे शासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. मात्र याबाबत योग्य तो मार्ग काढून शेतकर्‍यांना व प्रकल्प बाधीतांना दिलासा देणे गरजेचे आहे.

प्रतिवर्षाप्रमाणेच या भागतील शेती वसाहतीतील घरांचे या वर्षाच्या चालू महिन्यात मोठया प्रमाणावर नुकसान झालेले असून याबाबत लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी यांनी पाहणी करून शेतकरी व नागरीकांना तात्पुरता दिलासा दिला असला तरी योग्य ते उपाय योजना होणे गरजेचे असल्याने नागरीकांचे म्हणणे आहे.

 

 

LEAVE A REPLY

*