सेंट्रल बँकेविरुद्ध कारवाईची मागणी

0
नंदुरबार / बनावट सातबारा तयार करुन व खोटे कागदपत्र सादर करुन भूमीहिन असणार्‍या मजूरांच्या नावावर म्हसावद येथील सेंट्रल बँकेने पीककर्ज दिले असून बँकेवर कारवाईची मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली असून याबाबत ग्रामविकास राज्यमंत्री ना.दादा भुसे यांना निवेदन देण्यात आले आहे.

शहादा तालुक्यातील मौजे शिरुड त.हवेली येथील स्थानिक रहिवासी जगन जामसिंग वळवी, रायसिंग रामसिंग पवार, सायसिंग रामसिंग पवार, व मोग्या आलमसिंग मोरे यांच्या मालकीची कोणतीही शेतजमीन नाही.

सदर चारही इसम भूमीहीन आहेत. असे असतांना त्यांच्या नावावर बनावट सातबारा तयार करुन म्हसावद येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून कोणीतरी पीककर्ज घेतले आहे.

सर्व अर्जदार भूमीहीन असतांना त्यांच्या नावावर बँकेने लाखोंचे कर्ज दिले कसे असा सवाल उपस्थित होत आहे.

सद्यस्थितीत भूमीहीन असणार्‍या चौघांना बँक मात्र कर्ज फेडीसाठी तगादा लावत असून मानसिक त्रास देत आहे. खरे तर चौघांनी कर्जच घेतले नाही तर फेडण्याचा प्रश्न नाही, असे निवेदनात म्हटले आहे.

तसेच बनावट सातबारा असल्याचे नवीन शाखा व्यवस्थापकांच्या लक्षात आले तर यापुर्वी असणार्‍या व्यवस्थापकांनी कर्ज मंजूर केले कसे असा सवाल  करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

*