क्रीडा सहविचार सभेवर क्रीडाशिक्षकांचा बहिष्कार

0
मोदलपाडा, ता. तळोदा । वार्ताहर-शासनाने क्रीडाशिक्षकांच्या तासिका कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात सर्व क्रीडा शिक्षक व संघटन उतरल्या असून सर्व क्रीडा शिक्षकांनी क्रीडा सहविचार सभांवर बहिष्कार टाकला आहे.
सन 2017-18 शालेय क्रीडा स्पर्धा नियोजन सभा जिल्हाक्रीडाधिकारी मार्फत आजपासून सुरूवात झाल्या. आज तळोदा अक्कलकुवा या ठिकाणी तालुक्यातील क्रीडाशिक्षकांच्या उपस्थितित तालुकास्तरीय स्पर्धेचे नियोजन होणार आहे.
मात्र क्रीडाशिक्षकांनी सभेला विरोध करीत शासनाने क्रीडाशिक्षकांच्या विरोधात तासिका कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याविरुद्ध निवेदन देण्यात आले.
सभेसाठी क्रीडाविभागास असहकार आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान राज्यभरात क्रीडाशिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

जिल्ह्यात तालुकानिहाय नियोजन बैठका अशा-
तालुकास्तरीय शालेय क्रीडास्पर्धांचे नियोजन करण्याकरिता सालाबादाप्रमाणे क्रीडास्पर्धेचा तारीख व स्थळ निश्चित करण्यासाठी सदर बैठक घेण्यात येते. यात वेळापत्रक तयार होऊन त्यानुसार स्पर्धा होतात. मात्र यंदा या नियोजन सभेवरच निषेध म्हणून बहिष्कार टाकण्यात आला.

आज दि.15 जुलै रोजी सकाळी 10 वाजता गो.हू. महाजन हायस्कुल तळोदा येथे सभा होणार होती. परंतू क्रीडा शिक्षकांनी सभेवर बहिष्कार टाकून केवळ क्रीडा अधिकार्‍यांना निवेदन दिले.

अक्कलकुवा येथे न्यू इंग्लिश स्कुल येथे दुपारी 1 वाजता देखील सभा न घेता निवेदन दिले. नंदुरबार येथे दि.17 जुलै रोजी सकाळी 10 जिल्हाक्रीडा संकुल व दुपारी 3 वाजता नवापूर येथे शिवाजी हायस्कूल येथे सभा होणार आहे. तर शहादा येथील पुज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित कनिष्ठ महाविद्यालय येथे सकाळी 10 वाजता व धडगांव येथे ठकार विद्यालयात दुपारी 2 वाजता सभा होणार आहे.

मात्र, या सर्व सभांवर क्रीडा शिक्षकांनी बहिष्कार टाकला आहे. तळोदा तालुक्यातील क्रीडाशिक्षकांची सालाबादाप्रमाणे शालेय क्रीडा नियोजन करण्यासाठी आज सहविचार सभा गो.हू.महाजन शाळेत सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, सभेवर बहिष्कार टाकत तालुक्यातील क्रीडाशिक्षकांनी मागण्यांचे निवेदन जिल्हाक्रीडाअधिकारी घनश्याम राठोड यांना दिले आहे.

यावेळी तळोदा तालुक्यातील विविध शाळेतील क्रीडा शिक्षक उपस्थित होते. मुख्याध्यापक संघानेदेखील या भूमीकेला पाठींबा जाहीर केला आहे. यावेळी जिल्हाक्रीडा अधिकारी घनश्याम, संदीप ढाकणे महेंद्र काटे यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी प्रा.अजित टवाळे, गजानन काटे, सुनील मगरे, निलेश माळी, एस.व्ही.अहिरे, कमलेश मगरे, पदमेश माळी, राम सूर्यवंशी, सुनील सूर्यवंशी, निलेश सूर्यवंशी, भूषण तडवी, एन.एन.वसावे, एस.बी.सूर्यवंशी, आर.जे.सूर्यवंशी, एन. सी.पाटील, एस.बी.पाटील, आर.के. पाडवी, एस.एम.सागर आदींनी गो.हू.महाजन शाळेच्या प्रवेशद्वारावर निवेदन दिले.

दुपारून अक्कलकुवा येथे 1 वाजता असणारी नियोजित सभादेखील झाली नाही. यावेळी विजय पाटील, एन.बी.गोसावी, एन.डी.सूर्यवंशी, आर.एच.सलाउद्दीन या क्रीडाशिक्षकांनी निवेदन दिले. त्यामुळे आता दोन्ही तालुक्याची सभा न होता निवेदन देण्यात आले.

दरम्यान शहादा, धडगांव, नवापूर व नंदुरबार येथेदेखील अशाच पद्धत्तीने निवेदन दिले जाणार आहे. जिल्हयातील सर्व क्रीडा शिक्षकांनी क्रीडा सहविचार सभेवर बहिष्कार टाकल्याने आगामी क्रीडा स्पर्धांसाठी क्रीडा शिक्षक मिळेल की नाही याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

 

LEAVE A REPLY

*