शेतकरी कर्जमाफीची यादी जाहीर झाल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही !

0
नंदुरबार । दि.14 । प्रतिनिधी-येत्या आठवडयापासून सुरु होणार्‍या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारने कर्जमाफी झालेल्या शेतकर्‍यांची यादी जाहीर करावी, अन्यथा अधिवेशन पुढे चालू देणार नाही, असा इशारा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
दरम्यान, ढोल वाजवून प्रश्न सुटले असते तर आम्ही दररोज ढोल बडवत फिरलो असतो, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेच्या आंदोलनाची खिल्ली उडवली.
येथील नाटयमंदिरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पक्षाच्या संघटनात्मक आढावा बैठकीत श्री.पवार बोलत होते. यावेळी व्यासपिठावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आघाडी अध्यक्षा चित्रा वाघ, आ.जयदेवराव गायकवाड, युवती राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा स्मिता पाटील, प्रमोद हिंदूराव, संग्रामसिंग कोते पाटील, जिल्हा प्रभारी उमेश पाटील, जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत, माजी आ.शरद गावीत, युवक जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी, निखीलभाई तुरखिया, अनिल भामरे, इश्वर बालगुडे आदी उपस्थित होते.

श्री.पवार पुढे म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकार शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्याच्या बाबतीत अपयशी ठरले आहे. राज्यात अनेकठिकाणी दुबार, तिबार पेरणी झाली आहे. पण शेतकर्‍यांना मदत मिळालेली नाही. हमीभावही मिळालेला नाही.

कर्जमाफीची घोषणा फसवी आहे. दररोज वेगवेगळे जीआर याबाबत काढले जात आहेत. बर्‍याच शेतकर्‍यांचे कर्जमाफीच्या यादीत नाव नाही. त्यामुळे कर्जमाफी मिळेल की नाही याबाबत शेतकरी संभ्रमात आहे.

त्यामुळे येत्या आठवडयात होणार्‍या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आम्ही कर्जमाफी झालेल्या शेतकर्‍यांची यादी सरकारला जाहीर करण्यास सांगू, त्याशिवाय अधिवेशनाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

शिवसेनेवर टिका करतांना श्री.पवार म्हणाले, धुळे येथे शिवसेनेच्या काही उत्साही कार्यकत्यार्ंनी जिल्हा बँकेसमोर ढोल वाजवून आंदोलन केले. ढोल वाजवून प्रश्न सुटले असते तर आम्ही दररोज ढोल बडवत फिरलो असतो.

शिवसेना सत्तेत सहभागी आहे. त्यांचे 12 मंत्री आहेत, ते सरकारची गाडी वापरतात, बंगले वापरतात, अधिकारी वापरतात, त्यामुळे शिवसेनेची भुमिका ही गांडुळासारखी दोन तोंडी, दुटप्पी आहे.

मुंबईच्या महापालिकेवर गेल्या वीस वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे. या महापालिकेकडे 60 हजार कोटीच्या ठेवी आहेत. त्यातून शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी का मदत करत नाहीत? हवे तर शासनाला यातील काही रक्कम कर्जरुपात द्यावी, त्यामुळे शेतकर्‍यांचे कर्जमाफ होईल आणि सरकारचेही काम होईल, असेही ते म्हणाले.

परंतू शिवसेनेची नौटंकी आता लोकांना कळली आहे. ते फक्त दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत. शेतकर्‍यांशी त्यांची कुठलीही बांधीलकी नाही. त्यांनी फक्त आमची बदनामी करण्याची सुपारी घेतलेली दिसते, असेही ते म्हणाले.

गतकाळात आपल्याकडून देखील काही चुका झाल्या असतील त्यात सुधारणा करावी. जे लोक सोडून गेले आहेत त्यांचा विचार न करता जे आहेत त्यांच्यात पक्ष संघटन मजबूत करुन समन्वय राखावा, पराभवाने खचू नये तसे विजयाने हूरळुनही न जाता पक्षाचे काम करावे, असे आवाहनही श्री.पवार यांनी केले.

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, आ.डॉ.विजयकुमार गावीतांनी आदिवासी विकास मंत्री असतांना जिल्हाभरात विविध योजना राबविल्या.

परंतू त्यांच्यावर शरद पवार यांचा वरदहस्त होता. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्राबल्य वाढले. कार्यकर्त्यांनी जिद्दीने काम केले तर उद्या भविष्य उज्वल आहे.

राज्यात शिवसेनेची अवस्था आहे आज दारुण आहे. सरकारमध्ये राहून ते सरकारविरोधी कारवाया करत आहेत. सरकारमध्ये राहून कर्जमाफी होत नसेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे.

जिल्हयात ढोल काय वाजवतात त्यापेक्षा राज्याच्या मंत्रीमंडळात असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर ढोल वाजवले पाहिजे.

सरकारमध्ये राहून दुटप्पी भुमिका घेणे योग्य नाही. जिल्हयात घडयाळाचा गजर करण्यासाठी सर्व कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांनी प्रयत्न करावा.

अन्याय, अत्याचाराने डोके वर काढल्याने रज्यात विकृतीचे प्रमाण वाढत चालले आहे. त्याला सरकारची निष्क्रीयता जबाबदार आहे.

येत्या 22 जुलै रोजी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्या दिवसापासून गाव तेथे राष्ट्रवादी व घर तेथे झेंडा हे अभियान राबविले जाणार आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी पक्षाचे चित्रा वाघ, जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत, जिल्हा प्रभारी उमेश पाटील, माजी आ.शरद गावीत यांनी मनोगत व्यक्त केले.

 

LEAVE A REPLY

*