150 जणांनी आपले आडनाव ‘भारतीय’ ठेवले

0
नंदुरबार । दि.13 । प्रतिनिधी-वीजन ऑफ बाबासाहेब वेलफेअर असोसिएशनतर्फे भारतीय संविधानाच्या प्रचार व प्रसारासाठी भारतीय संविधान रथयात्रा आयोजीत केली असून या रथयात्रेचा डॉ.बाबासाहेबांच्या जन्मभूमी येथून दि.14 एप्रिल रोजी शुभारंभ करण्यात आला आहे.
या अंतर्गत 150 जणांनी आपले आडनाव बदलून ‘भारतीय’ असे ठेवले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 126 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर ही रथयात्रा काढण्यात आली असून ही रथयात्रा 7 वर्षे सुरू राहणार आहे.

या रथयात्रेदरम्यान संपूर्ण भारतात संविधानाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. वीजन ऑफ बाबासाहेब वेलफेअर असोसिएशनतर्फे रथयात्रेदरम्यान भारतीय संविधानाच्या 30 करोड प्रती जनसहभागातून विविध राज्यात वाटप करण्यात येणार आहेत.

यावेळी ‘भारतीय संविधान बचाओ-देश बचाओ’, ‘भारतीय संविधान पढाओ-देश को आगे बढाओ’, ‘एक भारत श्रेष्ठ भारत बनाओ’चा नारा देण्यात येणार असून भारतीय संविधानाप्रती जनतेत जनजागृतीचे कार्य एन.जी.ओ. च्या सदस्यांमार्फत करण्यात येणार आहे.

या सदस्यांनी आपापले आडनांव बदलले असून त्यांच्या नावापुढे ‘भारतीय’ हे आडनांव लावण्यात आले आहे. या संघटनेत राष्ट्रीय अध्यक्ष एडवीन भारतीय, राष्ट्रीय उपाध्यक्ष लता भारतीय, राष्ट्रीय सचिव सुशिला भारतीय, राष्ट्रीय कोषाध्यक्ष कार्ल भारतीय, विजय भारतीय, थॉमस भारतीय व प्रितम भारतीय, मंजूर अहमद भारतीय, वर्षा भारतीय, जॉन भारतीय, राहुल भारतीय, मिथून भारतीय, राजेश भारतीय, कुंदन भारतीय, अनिल भारतीय, आमिर भारतीय, अभिषेक भारतीय यांच्यासह 150 पदाधिकार्‍यांचा समावेश आहे.

भारतीय संविधानाविषयी जनतेत जागृती करणे हा या रथयात्रेचा मुख्य उद्देश असून विविध शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या वर्गांमध्ये भारतीय संविधान हा अनिवार्य विषय देण्याची मागणी पंतप्रधान यांच्याकडे करण्यात आली आहे.

हे संविधान रथ पूर्ण अत्याधुनिक साधनांनी सज्ज असून त्यात वाइफाईलेस सॅटेलाईट, सीसीटीव्ही, प्रोजेक्टर अशा साधनांचा वापर करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

*