पुष्पदंतेश्वर कारखाना पुन्हा सहकार तत्वावर चालवावा !

0
नंदुरबार । दि.13 । प्रतिनिधी-तालुक्यातील समशेरपूर येथील पुष्पदंतेश्वर सहकारी साखर कारखाना हा अ‍ॅस्टेरीया अलाईडच्या प्रशासनाकडून ताब्यात घेवून तो सहकार तत्वावर चालवावा अशी मागणी कारखान्याचे माजी चेअरमन मुकूंद पाटील यांच्यासह माजी संचालकांनी केली आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात मुकूंद पाटील यांनी म्हटले आहे की, राज्यातील 40 सहकारी साखर कारखाने अवसायानात काढण्यात आल्यानंतर त्यांना अनेक खाजगी कंपन्यांनी विकत घेतले.
त्यामुळे सहकारी कारखानदारी संकटात सापडली होती. याबाबत अण्णा हजारे, मेधा पाटकर, खा.राजू शेट्टी यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्याने फौजदारी गुन्हेदेखील दाखल केले होते.

पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले, पोर्ले येथील दत्त सहकारी साखर कारखाना जिल्हा बँकेने 2009 मध्ये सिक्युरिटायझेशन कायद्यातंर्गत ताब्यात घेतला.

सहा वर्ष कारखाना वारणा साखर कारखान्यास चालविण्यास दिला. त्यानंतर बँकेने कारखाना विक्रीस काढून तो 108 कोटीत दालमिया शुगर्सने विकत घेतला.

या विरोधात कारखान्याचे चेअरमन अध्यक्ष गणपतराव सरनोबत यांनी सहकार व लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पुर्वीचा निर्णय रद्द करीत कारखान्याच्या पुनर्रचनेचा आदेश दिला.

त्यामुळे कारखाना पुन्हा सहकारी तत्वावर सुरू होण्यास चालना मिळणार आहे. त्याच अनुषंगाने पुर्वीचा पुष्पदंतेश्वर साखर कारखाना देखील ऑस्टेरिया शुगर कंपनीकडून ताब्यात घेण्यात यावा.

या कारखान्याची जमिनीची किंमत 50 कोटी असताना कारखाना अवघ्या 43 कोटी रूपयांना विकण्यात आला. शिवाय गोदामात पडलेली साखर, सभासदांचे शेअर्स याबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नव्हता.

यासर्व बाबींचा विचार करून ऑस्टेरिया शुगर कंपनीकडून कारखाना परत घेवून सहकारी तत्वावर सुरू करावा, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.

यासाठी लवकरच सभासांची बैठक घेवून आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचेही माजी चेअरमन मुकूंद पाटील, माजी व्हा.चेअरमन हिरालाल पाटील, संचालक दत्तु पाटील, छोटूलाल पाटील यांच्यासह सभासदांनी म्हटले आहे.

 

LEAVE A REPLY

*