कळंबू येथे रंगला गुरु-शिष्य सोहळा

0
कळंबू/मामाचे मोहिदा ता.शहादा । दि.13 । वार्ताहर-माजी विद्यार्थ्यांच्या सत्काराने माजी शिक्षकांना त्यांची किंमत कळली. माजी विद्यार्थ्यांकडून होणारा सत्कार म्हणजे माजी शिक्षकांचे वय आणखी चार ते पाच वर्षांनी वाढल्यासारखे झाले.
विद्यार्थी या सत्काराने आमच्या ॠणातून मुक्त झाले. आता आम्ही त्यांच्या ॠणात अडकलो, असे उद्गार दादासाहेब गुलाबराव बोरसे शेतकी विद्यालयाचे माजी प्राचार्य साहेबराव बोरसे यांनी काढले.
येथील दादासाहेब गुलाबराव बोरसे माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा व निवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा गौरव समारंभ घेण्यात आला.

यावेळी संस्थेच्या आजी-माजी संचालक मंडळांचाही गौरव करण्यात आला. यावेळी प्राचार्य बोरसे बोलत होते. शाळेच्या शिक्षण मंडळाची स्थापना 1969 मध्ये झाली. तेव्हापासून कार्यरत व सध्या निवृत्त झालेल्या शिक्षकांचा, शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने सर्व माजी विद्यार्थी एकत्र येत आहेत.

या शाळेतून बहुसंख्य विद्यार्थी आज विविध शासकीय पदावर तसेच परदेशात कार्यरत आहेत. या सर्वांनी मिळून ‘कळंबू हायस्कूल विद्यार्थी’ या व्हॉटस्अ‍ॅप गृपच्या माध्यमातून एकत्र येवून गुरूजनांचा गौरव करण्याचे ठरवले होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीस सर्व माजी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना वाजत गाजत व्यासपीठाजवळ नेले. महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन विजयराव बोरसे, उपाध्यक्ष हिंमतराव बोरसे व संचालक म।डळ यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.

प्रास्ताविकात पत्रकार बळवंत बोरसे यांनी कार्यक्रमाचे आयोजन कशा पध्दतीने करण्यात आले व त्यामागील भूमिका कोणती त्याचे स्पष्टीकरण केले.

माजी शिक्षक व संस्थेचे सचिव डी.ए. मोरे, साहेबराव बोरसे, शिक्षक प्रतिनिधी व संचालक संभाजी सनेर, प्रकाश पाटील, विजया चौधरी, कस्तुरी बोरसे, निळकंठ रणधुमाळ, पंडीत महाजन, वसंत पाटील, डी.यु.गिरासे, रमण मंडळे, साहेबराव पवार, पंढरीनाथ पाटील, मोरेश्वर पवार, प्राचार्य संजीव संधानशिव, बन्सीलाल बोरसे, जयप्रकाश गवळे, आर.पी.पाटील, रघुनाथ बेलदार, जिजाबराव निकुंभ, मंजुळा बोरसे, योगीराज बोरसे, गोरख पाटील, कृष्णा चव्हाण, भगवान बोरसे, जयप्रकाश आगळे व संस्थेचे चेअरमन विजय बोरसे, उप चेअरमन हिंमतराव बोरसे, रामचंद्र बोरसे यांचा स्मृतिचिन्ह, गुरूप्रेम, बुके देवून माजी विद्यार्थ्यांनी सत्कार केला. माजी विद्यार्थी विजय बोरसे, संतोष बागले, न.मा. भामरे, साहेबराव शिंदे, हिंमत चित्ते, प्रताप बोरसे, भटु महाले, राजेंद्र देवरे, रामराव बोरसे, भास्कर कुवर, प्रविण महाजन, रमेश पाटील, वैशाली मोरे, नरेंद्र मंडळे, विजया चौधरी, राजेंद्र बोरसे यांनी आपल्या भाषणात माजी शिक्षकांनी केलेल्या कार्याचा गौरव केला.

शिष्यांना फक्त शिक्षणचे दिले नाही तर माता पिताप्रमाणे प्रेम करून शैक्षणिक अडचणी सोडविल्या. शाळेची गोडी निर्माण केली असे शेवटी म्हणाले.

माजी शिक्षक सत्कारार्थी रघुनाथ बेलदार, आर.पी. पाटील, बन्सीलाल बोरसे, डी.यु. गिरासे, जयप्रकाश आगळे, पर्यवेक्षक मधुसूदन चौधरी, राजेंद्र नाईक, यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, गेल्या 30 वर्षापूर्वी विद्यार्थ्यांचे पालक शिक्षकांना सांगत माझ्या मुलास चांगली शिक्षा केली तरी चालेल पण तो हुशार झाला पाहिजे.

विद्यार्थ्यांनी मोबाईलचा उपयोग चांगल्या कामासाठी करावा. पुर्वीचे विद्यार्थी आज्ञाधारक होते म्हणून त्यांना मनासारखा आकार देता आला. विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक अडचणी आजसुध्दा माजी शिक्षकांसमोर निसंकोचपणे मांडाव्यात त्या अडचणी आम्ही सोडविण्याचा प्रयत्न करू असे शेवटी म्हणाले.

विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी वॉटर फिल्टर बसविणे व कळंबू मराठी शाळा डिजीटल करण्यात येईल असे माजी विद्यार्थी व्हॉटसअ‍ॅप गृपतर्फे जाहीर करण्यात आले.

कार्यक्रमात माजी विद्यार्थी व शिक्षक यांच्या हस्ते विद्यालयाच्या इमारतीजवळ वृक्षारोपण करण्यात आले. सुत्रसंचालन भटु पाटील, संजय देवरे व भूषण गवळे यांनी केले. आभार डॉ.दिपक मोरे यांनी मानले. कार्यक्रमास कुकावल, कोठली, कळंबू परिसरातील गावातील बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*