रेल्वे स्थानकावर सोयी-सुविधा निर्माण करण्याची मागणी

0
नंदुरबार । दि.12 । प्रतिनिधी-नंदुरबार रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी सोयी सुविधा निर्माण कराव्यात अशा आशयाचे निवेदन नंदुरबार रेल्वे स्थानक सल्लागार समितीचे सदस्य जवाहरलाल जैन यांनी पश्चिम रेल्वे मंडल रेल प्रबंधक यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार रेल्वे स्थानकावर दुहेरीकरण झाल्यामुळे प्लॅटफॉर्म क्र.1 व 2 व 3 वर प्रवासी गाडया नियमीतपणे येत आहे.
परंतु अपंग व ज्येष्ठ नागरीक यांना रेल्वे स्थानकावरील पुलाच्या पायर्‍या चढून जाणे कठीण होत आहे व रेल्वे लाईन ओलांडून जाणे धोक्याचे आहे.

ही अडचण लक्षात घेवून नंदुरबार रेल्वे स्थानकावर स्वयंचलित जीना त्वरीत बसविण्यात यावा. प्लॅटफॉर्म क्र. 1 व 2 यांना जोडण्यासाठी हा जीना बसविणे आवश्यक आहे.

तोपर्यंत रेल्वे लाईनच्यामध्ये पेव्हर ब्लॉक टाकून व्हीलचेअर नेण्याची सोय उपलब्ध करून द्यावी. तसेच गाडयांची संख्या लक्षात घेता.

नंदुरबार रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्र.4 तयार करण्यात यावा. शहरातून जाणार्‍या रेल्वे लाईनमुळे शहराचे दोन भागात विभाजण झाल्यामुळे प्लॅटफॉर्म चार आवश्यकता आहे.

नंदुरबारची वाढती लोकसंख्या लक्षात घेवून या सुविधा त्वरीत उपलब्ध करून द्याव्यात तसेच प्लॅटफॉर्म शेडची लांबी देखील वाढवण्यात यावीत.

रेल्वे स्थानकाच्या इमारतीचे नुतनीकरण करण्यात यावे. जोधपूर- बाडमेरसाठी समदडी, भिलडी अशी सरळ नवीन रेल्वेसेवा उपलब्ध करून द्यावी.

राजस्थानमधील लाखो रहिवाशी व्यवसायासाठी दक्षिणेत जात असल्याने ही रेल्वेसेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. नवजीवन एक्सप्रेसच्या मार्गात समदडी, भिलडीमार्गे जोतपूरपर्यंत ही रेल्वे करण्यात यावी.

यशवंतपूर- अहमदाबाद एक्सप्रेसपण भिलडीपर्यंत वाढविण्यात यावी. तसेच नागपूर- अहमदाबाद प्रेरणा एक्सप्रेस देखील बाडमेरपर्यंत करण्यात यावी.,

नंदुरबार- पुणे ही रेल्वे प्रशासनाने बर्‍याच वर्षापासून मंजूर केली असून ती त्वरीत सुरू करण्यात यावी. गुजरातमधून किंवा राजस्थानमधून सुरत- वसईकर मार्गे पुणे अशी रेल्वे असून नंदुरबारहून सुरू होणारी पुणे रेल्वे सुरत, जळगांव, मनमाड, पुणे अशी सुरू करण्यात यावी.

तसेच नंदुरबार- मुंबई रेल्वे देखील सुरू करण्यात यावी. राजधानी मुंबई येथे जाण्यासाठी अनेकांना ही रेल्वे सोयी होणार आहे आणि ओखा -रामेश्वरम या गाडीला नेहमीसाठी थांब देण्यात यावा.

या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य मोहन खानवानी, संजय शाह, अशोक चौधरी, पिनल शाह, समीर शाह, गजेंद्र चौधरी आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

 

LEAVE A REPLY

*