भेदाभेद करणारे लोक राष्ट्र निर्माण करु शकत नाहीत – नितीन गणोरकर

0
नंदुरबार । दि.11 । प्रतिनिधी-ब्राम्हणवाद जातींचा निर्माता आहे. जाती माणसांमध्ये भेदा-भेद निर्माण करतात. भेदाभेद करणारे लोक राष्ट्र निर्माण करु शकत नाहीत, त्यामुळे ब्राम्हणवाद संपविणे हाच खरा राष्ट्रवाद आहे, असे प्रतिपादन बामसेफचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नितीन गणोरकर यांनी केले. ते येथील बामसेफच्या नंदुरबार जिल्हा अधिवेशनात बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन सेवानिवृत्त मुख्याध्यापक दादाभाई ढोढरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी बामसेफचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नितीन गणोरकर, बामसेफचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रविण खरे तर प्रमुख पाहुणे म्हणून इरफान सैय्यद आदी उपस्थित होते.
यावेळी गणोरकर पुढे म्हणाले की, जातीची मानसिकता आपल्याला विकासापासून दूर नेते. म्हणून आपण आपल्या जातीचा त्याग केला पाहिजे.

ब्राम्हणवाद जाती निर्माण करतो, म्हणून आपण ब्राम्हणवादाचा नाश केला पाहिजे. मनस्मृतीच्या लिखाणापूर्वी माझ्या पूर्वजांची जात नव्हती तर वर्ण होता.

क्षुद्रवर्ण व वर्ण व्यवस्था ही आर्याच्या आक्रमणानंतर निर्माण झाली. म्हणून आर्याच्या आक्रमणापूर्वी आम्ही या धरती मालक म्हणजे मुळ निवासी आहोत, माल असण्याची भावना गौरव देते.

म्हणून जातीच्या ओळखीचा त्याग करुन मुलनिवासी ओळख आत्मसात केली पाहीजे, असे ते म्हणाले. यानंतर इरफान सैय्यद म्हणाले की, मानव वंशाची निर्मिती अफ्रिकेतून झाली.

विज्ञानाच्या दृष्टीतून विचार केला तर अफ्रिकेतील एक मादा ही आपली सर्वांची माता आहे. तर मग वर्तमानात असणार्‍या जाती, पंथ, धर्म कुठून आले. याचा अभ्यास करण्याची गरज आहे.

दुसर्‍या सत्रात संघटनात्मक कार्याच्या सर्वोच्च प्राथमिकतेनेच व्यवस्था परिवर्तन या विषयावर प्रविण खरे म्हणाले की, कार्यकर्ते आपल्या संघटनात्मक कार्यास प्राथमिकता का देत नाहीत? कार्यकर्त्यांनी संघटन निर्माणाची प्रक्रीया, त्याचा उद्देश, विचारधारा समजून घेतली पाहीजे.

वर्तमान ब्राम्हणी व्यवस्था नष्ट होवू नये, ती कायम रहावी, यासाठी साडेतीन टक्के लोक व्यवस्था टिकविण्यासाठी सत्तेत असून देखील कार्यरत आहेत.

म्हणून आपणांस फुले-आंबेडकर अपेक्षित व्यवस्था निर्माण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपल्या प्राथमिकता बदलल्या पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी प्रतिनिधी म्हणून रविशंकर सामुद्रे व हेमकांत मोरे यांनी मत व्यक्त केले. अधिवेशनात जिल्हाभरातून प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रथमसत्राचे सुत्रसंचलन ललिता पानपाटील यांनी केले. प्रास्ताविक बी.एस.पवार यांनी केले. दुसर्‍या सत्राचे सुत्रसंचलन पावबा ठाकरे यांनी केले.

प्रास्ताविक विजय शिरसाठ यांनी केले. आभार परमेश्वर मोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वप्नित सामुद्रे, शैलैंद्र वाघमारे, गोरखनाथ पवार, सुनिता पवार, दीपक पानपाटील, गजाजन खिल्लारे, संतोष नागमल, गौतम भामरे, संघमित्रा बेडसे, धनंजय वाघ यांनी परिश्रम घेतले.

 

LEAVE A REPLY

*