नवापूर-पिंपळनेर रस्त्यावर व्यापार्‍याकडून २ कोटी ४१ लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

0
नंदुरबार | प्रतिनिधी  :  नवापूर-पिंपळनेर रस्त्यावर इनोव्हा गाडीतील सहा इसमांनी सफारी गाडीतील व्यापार्‍याकडून २ कोटी ४१ लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना काल दि. ११ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.

याप्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडताच रात्री १२ वाजेच्या पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेमुळे व्यापार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. सदरची रोकड ही हवाला प्रकरणाची असल्याचे समजते.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरत येथील हरेशभाई पटेल, मेहुलभाई पटेल व शैलेशकुमार द्वारकाभाई पटेल हे जळगावहून अहमदाबादला सफारी गाडी (क्रमांक एमएच १९-बीयु ९००९) ने २ कोटी ४१ लाख ५० हजार रुपयांची रोकड घेवून जात असतांना इनोव्हा गाडी (क्र.जीजे ०५-सीएल २२४३) मधून अज्ञात सहा जणांनी काल दि. ११ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास नवापूर-पिंपळनेर रस्त्यावर नवापूर पासून ५ कि.मी. अंतरावर गाडी अडवून पटेल यांच्याकडील सर्व २ कोटी ४१ लाख ५० हजार रुपयांची रोकड लुटून पोबारा केला.

याबाबत चालक शैलेशकुमार द्वारकाभाई पटेल यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात सहा दरोडेखोरांविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत करीत आहेत.

दरम्यान, घटना घडताच रात्री १२ वाजेच्या सुमारास पोलिस अधीक्षक संजय पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी नवापूरला भेट दिली.

पोलीस अधीक्षकांनी सदर घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ पथकांची नियुक्ती करुन प्रकरणाचा छडा लावण्याचे आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

*