Type to search

maharashtra आवर्जून वाचाच नंदुरबार

राज्यपालांनी दत्तक घेतलेले गाव भगदरी बनले ‘स्मार्ट व्हिलेज’

Share

नंदुरबार ।  प्रतिनिधी :  राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी दत्तक घेतलेल्या भगदरी ता.अक्कलकुवा या गावात तीन वर्षात वीज, पाणी, आरोग्यासह विविध सुविधा पुरविण्यात आल्याने गाव स्वयंसिद्ध झाले आहे.

या गावात चोवीस तास पाणीपुरवठा असून शाळा, अंगणवाडयाही डिजीटल झाल्या आहेत. 15 कि.मी.क्षेत्र असलेल्या भगदरी गृपग्रामपंचायतीच्या विविध गावांना काल दि. 3 जानेवारी रोजी जिल्हाधिकार्‍यांनी पत्रकारांसह भेटी देवून कामांची पाहणी केली. या गावाला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठानेही दत्तक घेतले असून विविध एनजीओंनीही सुविधा पुरविल्या आहेत. या गावाचा कायापालट झालेला पाहून जिल्हाधिकार्‍यांनी समाधान व्यक्त केले.

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मे 2015 मध्ये अक्कलकुवा तालुक्यातील भगदरी हे गाव दत्तक घेतले आहे. भगदरी ही गृपग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीला 22 पाडे जोडलेले आहेत. हे क्षेत्र सुमारे 15 कि.मी. आहे. गावाची लोकसंख्या 7 हजार 765 लोकसंख्या आहे.

पुर्वी या गावाला पाण्याची समस्या होती. कारण लोकसंख्या वाडयापाडयांवर विखुरलेली होती. मात्र, राज्यपालांनी दत्तक घेतल्यानंतर परिसरात रस्ते तयार करण्यात आले आहे. परिसरात 60 ते 70 हातपंप उभारण्यात आले असून 14 सोलर पंपही देण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याची समस्या दूर झाली आहे. गावात त्यामुळे 24 तास पाणीपुरवठा होत आहे. याशिवाय परिसरात 12 जिल्हा परिषद शाळा व 14 अंगणवाडया आहेत. यापैकी 3 शाळा व 4 अंगणवाडया डिजीटल झाल्या आहेत. गावात सुमारे 70 लाख रुपये खर्चून अत्याधुनिक असे आदिवासी सांस्कृतिक भवन उभारण्यात आले आहे.

याठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, लग्न समारंभ, छोटेमोठे कार्यक्रम घेतले जावू शकतात. त्यामुळे परिसरातील लोकांची सोय झाली आहे. पशुवैद्यकीय विभागाने या गावात 3 कुक्कूटपालनचे शेड पुरवले आहेत. त्यामुळे बचत गटांना उत्पन्नही सुरु झाले आहे. या गावातील 6 पाडयांमध्ये वीजेेचे पोलदेखील नव्हते. महावितरणने याठिकाणी पोल पुरवून संपुर्ण विद्युतीकरण केले आहे.

याशिवाय श्रमदानातून वनराई बंधारे, घरकुले बांधण्यात आली असून वनविभागाने सुमारे 20 हेक्टर क्षेत्रात डोंगरांवर 22 हजार वृक्षांची लागवड केली आहे. सदर गाव राज्यपालांसोबतच कवयित्री बहिणबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठानेदेखील प्रयोगशाळा ते जमिन योजनेंतर्गत उमवि ग्रामदत्तक योजनेत भगदरी गावाला दत्तक घेतले आहे. याशिवाय काही एनजीओदेखील या गावाला मदत केली आहे. त्यामुळे भगदरी हे गाव ‘स्मार्ट व्हीलेज’म्हणून नावारुपाला आले आहे.

या भगदरी गावाला जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी पत्रकारांसह भेट देवून विविध कामांची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री.मालोदे, विभागीय वन अधिकारी श्री.थोरात, ग्रामविकास अधिकारी पी.बी.गिरासे यांच्यासह सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी गावात झालेली विविध कामे पाहून जिल्हाधिकार्‍यांनी समाधान व्यक्त केले.

भगदरी गावातील मंगलसिंग पाडवी या शेतकर्‍याने आपल्या शेतात विविध प्रयोग केले आहेत. त्याने गांडुळ खत प्रकल्प उभारला आहे. याशिवाय ओझोला गवत उगवले आहे. या गवताचे वैशिष्टय म्हणजे त्याच्याने कोंबडया, गायी, म्हशी यांची प्रतिकार शक्ती वाढते तसेच गायी व म्हशींची दूध देण्याची क्षमताही वाढते. तसेच त्याने नरेगातून कडकनाथ कोंबडयांचा फार्मही उभारला आहे.

याशिवाय अन्य काही शेतकर्‍यांनीदेखील आपल्या शेतात विविध प्रयोग केले आहे. प्रत्येकाच्या शेतात अनेक आंब्यांची झाडे आहेत. एकेका आंब्याच्या झाडातून त्यांना सुमारे 15 ते 20 हजाराचे उत्पन्न हंगामात मिळत असते. त्यामुळे या शेतकर्‍यांना पैशांसाठी कोणाकडे हात पसरावे लागत नसून ते स्वयंसिद्ध झाले आहेत.

जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते कन्या वनसमृद्धी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेंतर्गत ज्या शेतकर्‍यांच्या घरी मुलीचा जन्म झालेला असेल त्यांना साग, बांबु, आंबा यासह विविध फळझाडांचे वृक्ष मोफत पुरविण्यात येणार आहेत. भगदरी येथे 2017 मध्ये 111 मुली, 2018 मध्ये 91 मुलींचा जन्म झाला. त्या सर्व मुलींच्या मातेला जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते प्रत्येकी 10 वृक्षांचे वाटप करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!