शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी मिळावी

0
तळोदा / शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासह विविध मागण्यांचे निवेदन तालुक्यातील शेतकर्‍यांनी तहसिलदारांना दिले आहे.
तालुक्यातील शेतकर्‍यांनी कर्जमाफीबाबत तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यातील शेतकरी अडचणींच्या सामना करीत शेती व्यवसाय करीत आहेत.
शेतीमालाला भाव नाही, योग्य भाव मिळेल याची हमी नाही व जो भाव मिळतो तोदेखील उत्पादन खर्चावर आधारीत मिळत नाही.
त्यामुळे शेती व्यवसाय व पर्यायाने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. या सर्वाचा परिपाक म्हणून कधी नव्हे तो महाराष्ट्र राज्यातला शेतकरी आज संपात उतरला आहे. तळोदा तालुक्यातील शेतकरी या संपात सहभागी असून या संपास आमचा पाठींबा आहे.

शासनाने शेतकर्‍यांचा व कृषी क्षेत्राच्या अभ्यास करण्यासाठी स्वामिनाथन समिती नेमली होती. या समितीने शासनास विविध शिफारसी केल्या होत्या.

या शिफारशींना शासनाने लागू करण्याची भुमिका घेतली पाहिजे. आम्ही या शिफारसी लागू करण्याची मागणी करीत आहोत.

योग्य भाववाढ मिळावी व शेतकर्‍यांचे जीवनमान उंचवावे म्हणून महाराष्ट्रसोबतच मध्यप्रदेश राज्यातही शेतकरी मंदसौर येथे आंदोलन करीत होते.

या शेतकर्‍यांवर पोलीसी बळाच्या वापर करून त्यांच्यावर बेछुट गोळीबार करण्यात आला. ज्यात पाच निरपराध शेतकर्‍यांचा जीव गेला.

या गोळीबार घटनेच्या निषेध करतो व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. महाराष्ट्र राज्यातील शेतकरी विविध तर्‍हेने आर्थिक संकटात आहे.

त्याला उर्जितावस्था प्राप्त होण्यासाठी त्याची कर्जमाफी झाली पाहिजे. ही कर्जमाफी शेतकर्‍यांमध्ये कोणताही भेदाभेद न करता सरसकट सर्व शेतकर्‍यांना झाली पाहिजे.

या मोर्चाद्वारे कर्जमाफीची मागणी करण्यात आली. आंदोलन काळातील शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे, उत्पादनावर आधारीत शेतीमालास भाव मिळाला पाहिजे, शेतकरी संपाचा आड शेतीमालाच्या काळाबाजार करणार्‍यांना शिक्षा झााली पाहिजे, शेती सिंचनाखाली येण्यासाठी तळोदा तालुक्यातील रखडलेलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करावे, खरीप हंगामासाठी खते बी बियाणे यांचा पुरेसा पुरवठा करा, बोगस बियाणे ठेवणार्‍या दुकानरादांचे परवाने रद्द करावे, खरीप हंगामासाठी पीककर्ज तातडीने मंजूर करण्याची बँकांना ताकीद द्यावी, ग्रामीण भाग असल्याने पीककर्जाचे इंग्रजीत असलेले फॉर्म्स मराठीतून समजावून द्यावे, वेळेवर कर्ज मंजूर करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

निवेदनावर जयसिंग माळी, बबन चौधरी, गुलाबसिंग गिरासे, कैलास चव्हाण, सुदाम ठाकरे, कैलास पाटील, अशोक चौधरी, मणिलाल चौधरी, मंगेश पाटील, चुनिलाल पाटील, नारायण राजपूत, मोतीराम ईशी, सदानंद चव्हाण, सागर पटेल आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

LEAVE A REPLY

*