शेतकर्‍यांचे आंदोलन सातव्या दिवशीही सुरूच : आमदार-खासदारांच्या घरासमोर निदर्शने

0
नंदुरबार |  प्रतिनिधी :  आज सातव्या दिवशीही शेतकरी संप सुरुच होता. सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्यावतीने येथील आमदार व खासदारांच्या घरासमोर निदर्शने करण्यात आली. निवेदन स्विकारण्यासाठी कोणीही नसल्याने आंदोलनकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

यावेळी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान, तालुक्यातील लहान शहादे येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

आज सकाळी ११ वाजता नंदुरबार येथील आ.डॉ.विजयकुमार गावीत व खा.डॉ.हिना गावीत यांच्या घरासमोर मोर्चाद्वारे सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला.

यावेळी राज्यसरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी आमदार, खासदारांना निवेदन देण्यात येणार होते. परंतू दोन्ही लोकप्रतिनिधी बाहेर असल्यामुळे निवेदन स्विकारण्यास कोणीही नव्हते. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

शेतकर्‍यांच्या मागण्यांची तड लावण्यासाठी हजारो शेतकरी व शेतमजूर या मोर्चात सहभागी झालेले होते. या निवेदनात शेतकरी स्वतःच्या कुटूंबाला पुरेल एवढेच अन्नधान्य पिकवतील असा इशारा देण्यात आला. त्याचबरोबर शेतकर्‍यांचे सर्व कर्ज माफ करावे, स्वामीनाथन आयोगाची शिफारस अंमलात आणावी, शेतकर्‍यांना खते, बी-बियाणे, औषधे, औजारे किफायतशीर किंमतीत उपलब्ध करुन देण्यात यावीत.

शेतमाल साठवणुकीसाठी गोदामे व शीतगृहे उभारावे, शेतकर्‍यांच्या भाऊबंधकीतल्या नोंदी तत्काळ कराव्यात. वनहक्क दावे त्वरीत मंजूर करावे व शेतकर्‍यांना कर्ज, अनुदान देण्यात यावे.

हवामानाचा अचूक अंदाज शेतकर्‍यांना पुरेशा वेळेआधी देण्याची सोय करावी आदी विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या. निवेदनावर कॉ.रामसिंग गावीत, किशोर ढमाले, सुभाष काकुस्ते आदींसह १५ ते २० जणांच्या स्वाक्षर्‍या आहेत. यावेळी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

दरम्यान, लहान शहादे येथेदेखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आज रास्तारोको आंदोलन करण्यात आले. त्यात सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. या आंदोलनात महिला शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

आंदोलनानंतर शेतकर्‍यांना अटक करण्यात येवून त्यांची सुटका करण्यात आली. परिसरातील लहान शहादे, शिंदे, कोळदे, पळाशी, कोरीट आदी गावातील शेतकरी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झालेेले होते.

स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते कृष्णदास पाटील, पांडुरंग पाटील, यशवंत चौधरी, प्रकाश पाटील, विठ्ठल पाटील, सुनिल पाटील, भरत पाटील, सुरेश पाटील, मनोज पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*