शेतकरी संपाचा पाचवा दिवस : नंदुरबार व तळोदा तालुक्यात रास्तारोको; नवापूर येथे कडकडीत बंद

0
नंदुरबार/नवापूर/बोरद | दि.०५ | प्रतिनिधी/वार्ताहर :   शेतकरी संपाच्या पाचव्या दिवशी जिल्ह्यातील विविध संघटनांनी शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला. नवापूर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. तर नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तसेच तळोदा तालुक्यातील बोरद व गुजरातमधील उच्छल येथेही रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र बंदला नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातून १०० टक्के प्रतिसाद मिळाला आहे. परंतू बंदची पुर्वसुचना नसल्याने नागरिक व व्यापारी यांचे प्रचंड हाल झाले.

महाराष्ट्र सरकार शेतकर्‍यांचा संपूर्ण मागण्या मान्य कराव्यात. यासाठी राज्यात गेल्या पाच दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारे संप सुरू आहे. सोमवारी महाराष्ट्र बंदला आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत नवापूर शहरातील दुकाने सुरू होते.

व्यापार्‍यांना कोणत्याही पूर्वसूचना न दिल्याने भाजीपाला विक्रेते, हॉटेल व्यावसायिक, फळ विक्रेते, किराणा दुकान व अन्य दुकान सुरू झाली होती. परंतू काही युवकांनी सकाळी अचानक बंद करण्याचे आवाहन केल्याने धावफळ उडाली.

बस स्थानक परिसरातील काही हॉटेल व्यावसायिक यांना सकाळी तयार केलेले पदार्थ चहा, दुध, नाष्टा मोफत वाटप करण्याची वेळ आली. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक यांचे किरकोळ नुकसान झाले. आठ वाजेपासून नवापूर शहर कडकडीत बंद करण्यात आले. केवळ अत्यावश्यक सुविधा सुरू आहेत.

नवापूर बंदची पूर्वसूचना नसल्याने अनेकांचे हाल

सोमवारी नवापूर शहर बंद राहिल यासंदर्भात कोणाचीही पूर्वसूचना नसल्याने भाजीपाला विक्रेते व्यापारी व ग्रामीण भागातील असलेले ग्रामस्थांचे हाल झाले.

रिक्षाभरून आलेले लोकांना बाजार न करता घरी परतीचा प्रवास करावा लागला. यात वेळ व पैसा वाया गेला. भाजीपाला विक्रेते यांना आपला माल कवडीमोल भावात विक्री करून घरी जावे लागेल. शहरात कडकडाट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

नवापूरसह गुजरात राज्यातील उच्छल येथेदेखील कडकडीत बंद पाळण्यात आले. शेतकरी संपाला पाठींबा देण्यासाठी नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथे शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले. नंदुरबार- दोंडाईचा रस्त्यावर एक तास वाहतूक रोखली. यावेळी पोलिसांना निवेदन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

तळोदा तालुक्यातील बोरद येथेदेखील शेतकर्‍यांनी शेतकरी बंदला पाठींबा देवून रास्तारोको आंदोलन केले.
बोरद गावाबाहेर चौफुलीवर सकाळी ८ वाजता शेतकर्‍यांनी संपाला पाठींबा दर्शवून रास्तारोको आंदोलन केले. हे आंदोलन १०० टक्के यशस्वी झाले.

यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. कॉ.मंगलसिंग चव्हाण, कॉ.दयानंद चव्हाण, कॉ.बाबुलाल नवरे यांनी यावेळी फडणवीस सरकारचा निषेध केला.

दत्तात्रय पाटील, मंगेश पाटील, कॉ.मंगलसिंग चव्हाण यांनी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

LEAVE A REPLY

*