नंदुरबारात शेतकरी संपाचे पडसाद स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर कांदे फेकले

0
नंदुरबार | प्रतिनिधी :  राज्यातील शेतकर्‍यांनी विविध मागण्यांसाठी बुधवारी मध्यरात्रीपासून संपावर उतरण्याचा निर्णय घेतला असून, विविध भागात सरकारविरोधी जनक्षोभ उसळलेला असतांना त्याचे पडसाद नंदुरबारातही उमटले.

खा.राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकत्यांनी कांद्याने भरलेला ट्रक अडवून कांदे रस्त्यावर फेकून आंदोलन केले.

सरकारकडून कर्जमाफीची घोषणा होत नसल्याने तसेच विविध मागण्यांसाठी बुधवारी मध्यरात्री १२ वाजेपासून राज्यातील शेतकर्‍यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. ठिकठिकाणी संपाला गालबोट लागल्याचे दूरचित्रवाहिनीच्या माध्यमातून दिवसभर बातम्या झळकल्या.

दरम्यान, नंदुरबारात खा.राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नवापूर चौफुलीजवळून जात असलेला कांद्याने भरलेला ट्रक (क्र.एम.एच.१८/ए.ए.९२२०) अडवून कांदे रस्त्यावर फेकून आंदोलन केले. यावेळी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या.

उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांनी कार्यकर्त्यांची समजूर घालून त्यांना अटकाव केला. रस्त्यावर इतरस्तता पडलेली कांदे पोलिसांनी उचलून जप्त केले.

आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष घनश्याम चौधरी, तालुकाध्यक्ष कृष्णदास पाटील, जीवन पाटील, गोरख पाटील, रवींद्र पाटील, छोटू पाटील, मोहन पाटील, सुरेश पाटील, परशु पाटील, योगेश चौधरी आदींनी सहभाग घेतला.

चोख पोलीस बंदोबस्त

राज्यात विविध ठिकाणी होत असलेल्या आंदोलनाची परिस्थिती लक्षात घेऊन पोलिस विभाग रात्रीपासूनच सतर्क होता. नंदुरबारातदेखील आंदोलनाची शक्यता लक्षात घेता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार, शहर पोलिस ठाण्याचे निरिक्षक मिलिंद वाघमारे, तालुक्याचे सुभाष भोये यांच्यासह पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

*