नंदुरबारला गणेशमंडळांना तात्पुरती वीजजोडणीसाठी एक खिडकी सुविधा

0
नंदुरबार । प्रतिनिधी   महावितरणने गणेश उत्सवासाठी अल्पदरात तात्पुरती वीजजोडणीची सुविधा उपलब्ध केली आहे. तेंव्हा गणेशमंडळांनी भाविकांच्या सुरक्षेसाठी अधिकृत वीजजोडणी घ्यावी असे आवाहन महावितरण परिमंडळाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी केले आहे.

महावितरणने नंदुरबारात बसस्थानकासमोरील महावितरणच्या शहर विभाग कार्यालयातील ग्राहक सुविधा केंद्रात गणेशमंडळांना तात्पुरती वीजजोडणीसाठी एक खिडकी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. शिवाय सर्व स्थानिक शाखा कार्यालयांना तात्पुरती वीजजोडणी उपलब्ध करुन देण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.

गणेशाच्या दर्शनासाठी, मंडळाने साकारलेले आकर्षक देखावे पाहण्यासाठी गणेश भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. तेंव्हा वीजेचा सुरक्षित वापर होण्यासाठी अधिकृत वीज जोडणी घेणे आवश्यक आहे.यासाठी सार्वजनिक गणेश उत्सवासाठी मंडप, रोषणाई व देखाव्यासाठी उभारण्यात येणार्‍या वीज यंत्रणेची तपासणी परवानाधारक विद्युत कंत्राटदाराकडून करणे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे.

गणेश उत्सवासाठी प्रतियुनिट 3 रुपये 20 पैसे अधिक वहन कर 1 रुपये 18 पैसे असे एकुण 4 रुपये 38 पैसे प्रतियुनिट या अल्प दराने तात्पुरती वीजजोडणी महावितरणकडुन दिली जात आहे. महावितरणचे अधिकारी-कर्मचारी स्थानिक पातळीवर गणेशमंडळांना भेटून अधिकृत वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन करीत आहेत.

आपातकालीन परिस्थिती उद्भवल्यास गणेशमंडळ पदाधिकार्‍यांनी महावितरणच्या ग्राहक सुविधा केंद्राचे 1800 233 3435, 1800 102 3435, 1912 या टोल फ्रि क्रमांकावर अथवा स्थानिक अधिकार्‍यांशी संपर्क साधावा असे आवाहन महावितरण परिमंडळाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी केला आहे. या उपक्रमामुळे गणेश मंडळांना वीज जोडणी सोपी होणार आहे.

LEAVE A REPLY

*