पानी फाऊंडेशनतर्फे ‘जलमित्र’ मोहीम

0
नंदुरबार । दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी पानी फाऊंडेशनतर्फे राज्यव्यापी जलमित्र मोहिम सुरु करण्यात आली आहे. या प्रयत्नांना शहरातील नागरीकांची साथ मिळावी, प्रत्येक स्त्री, पुरूष युवकाला या कार्यात योगदान देण्याची संधी मिळावी यासाठी ही मोहिम प्रभावी ठरणार आहे, अशी माहिती पानी फाऊंडेशनचे मुख्यकार्यकारी अधिकारी तथा सत्यमेव जयते या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सत्यजीत भटकळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री.भटकळ म्हणाले, 8 एप्रिलपासून सत्यमेव जयते वॉटर कप 2018 स्पर्धेची सुरूवात झाली. महाराष्ट्राच्या 24 जिल्ह्यातील चार हजाराहून अधिक गावांतील लाखो शेतकरी गावकरी आपापल्या गावांना दुष्काळमुक्त करण्यासाठी कंबर कसली आहे.

दि.7 एप्रिलच्या मध्यरात्री 500 पेक्षा अधिक गावातील एक लाखापेक्षा अधिक गावकर्‍यांनी मध्यरात्रीपासून श्रमदान सुरू केले. काही ठिकाणी ढोल ताश्यांच्या गजरात याची सुरूवात करण्यात आली तर कुठे श्रमदानासाठी लागणारे शस्त्र पालखीत ठेवून त्याची मिरवणूक काढण्यात आली व शस्त्रपुजा करण्यात आली. दि.8 रोजी पहाटे पुन्हा लाखापेक्षा अधिक गावकर्‍यांनी यात सहभाग नोंदवला व दररोज नियमितपणे त्यांचे श्रमदान सुरू आहे.

या सगळयाचा संदर्भ म्हणजे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा ही पाणलोट व्यवस्थापन व जलसंधारण याकरीता गावागावांमधील सकारात्मक स्पर्धा आहे. यंदाचे वर्ष हे या स्पर्धेचे तिसरे वर्ष पहिल्या दोन वर्षात अंदाजे 1500 गावांनी यात आपला सहभाग नोंदविला असून त्यांनी जवळजवळ 10 हजार कोटी लिटर एवढी पाणी साठवण क्षमता निर्माण केली आहे. 2018 हे वॉटर कपचे तिसरे वर्ष असून नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार आणि शहादा या दोन तालुक्यातील 86 गावे यामध्ये सहभागी झाले आहेत.

राज्यात सर्वोत्तम तीन गावांमध्ये समाविष्ट होणार्‍या गावांना अनुक्रमे 75 लाख रूपये 50 लाख रूपये आणि 40 लाख रूपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. या व्यतिरीक्त प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्तम गावाला 10 लाखांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात येणार आहे. स्पर्धेचा कालावधी दि.8 एप्रिल ते 22 मे 2018 आहे. या प्रयत्नांना शहरातील नागरीकांची साथ मिळावी, प्रत्येक स्त्री, पुरूष युवकाला या कार्यात योगदान देण्याची संधी मिळावी यासाठी पानी फाऊंडेशनने जलमित्र मोहीम छेडली आहे. या उपक्रमाच्या घोषणेनंतर लेाकांचा या मोहिमेसाठी लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून एक लाख पेक्षा अधिक जलमित्रांनी आपला सहभाग नोंदविला आहे.

दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी आखलेल्या या जलमित्र मोहिमेत सहभागी होण्याची इच्छा असलेल्या कोणालाही या संकेतस्थळावर रजिस्टर करता येणार आहे. या संकेतस्थळावर रजिस्टर करून अनेक प्रकारच्या स्वयंसेवी कामांत भाग घेता येईल दि.1 मे रोजी चला गावी या नावाने महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातल्या शेकडो गावांमध्ये महाश्रमदान होणार असून हा जलमित्र उपक्रमाचा महत्वाचा भाग आहे.

सकाळी 6-10 आणि संध्याकाळी 4-7 अशा दोन सत्रांत शेकडो गावांत होणार्‍या श्रमदानाचा खुप मोठया संख्येने जलमित्र भाग घेतील अशा आशा भटकळ यांनी व्यक्त केली. शहर आणि गाव यांतली मोठी दरी भरून काढण्यासाठी एक व्यासपीठ उभारणे हा जलमित्र या उपक्रमागागचा एक हेतू आहे. तसेच महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यात प्रत्येक नागरीकाला सहभागी होण्यास एक सोपा मार्ग उपलब्ध करणे हाही त्यामागचा हेतू आहे, असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, गणेश मांडेकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*