Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच नंदुरबार मुख्य बातम्या राजकीय

# Video # नाईक पितापुत्रांच्या त्रासाला कंटाळूनच कॉंग्रेसला रामराम : जि.प.सदस्य भरत गावित यांचा गंभीर आरोप

Share

नंदुरबार | प्रतिनिधी :  लोकसभा निवडणुकीत मला तिकिट नाकारल्यानंतर आ.सुरुपसिंग नाईक आणि त्यांचे पूत्र शिरीषकुमार नाईक यांनी बर्‍याच गोष्टींमध्ये अडकविण्याचा प्रयत्न केला. आमच्यावर कोणतीही जबाबदारी सोपविण्यात आली नाही. या पितापुत्रांच्या त्रासाला कंटाळूनच आपण कॉंग्रेसला रामराम करत असून भाजपाला जयश्रीराम करत असल्याची माहिती जि.प.सदस्य तथा माजी जि.प.अध्यक्ष भरत गावित यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. दरम्यान, लवकरच मुंबईत पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भरत गावीत म्हणाले, ज्या नवापूर तालुक्यात, जिल्हयात गेल्या पन्नास वर्षापासून माणिकराव गावीत हे कॉंग्रेसमय होते. आम्हीही कॉंग्रेसचे काम करत होतो. परंतू नुकत्याच झालेलया लोकसभा निवडणूकीत आपण पक्षाकडे तिकिटाची मागणी केली होती. मात्र,  पक्षाने के.सी.पाडवींना उमेदवारी दिली. ज्या माणिकराव गावीतांनी आयुष्यभर देशाचे प्रतिनिधीत्व केले, अत्यंत स्वच्छ चारित्र्याचा माणूस म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचाच मी मुलगा. त्यांनी पक्षाकडे मला तिकिट मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

त्यात काही गैर नव्हते. पण पक्षाने तिकिट नाकारले. त्यावेळी पक्षाचे आ.सुरुपसिंग नाईक,  आ.अमरीशभाई पटेल, आ.के.सी.पाडवी, माजीमंत्री ऍड.पद्माकर वळवी यांनी मला विश्‍वासात घेतले नाही. त्यांनी मला समजवले असते, भविष्यात आपला विचार करु असेही बोलले असते तर आम्हाला बरे वाटले असते. परंतू तसे झाले नाही. त्यामुळे आम्ही पोरके झालो. माणिकराव गावीतांनी इतकेवर्ष कॉंग्रेसची सेवा केली, स्वतःला वाढवले नाही, पण पक्षाला वाढवले. अशा एका मनमिळावू स्वभावाच्या व्यक्तीला पक्षाने डावलले म्हणून दुःख झाले.

मात्र, तरीही लोकसभा निवडणूकीत पक्षाची प्रामाणिक सेवा केली. परंतू आमच्यावर अविश्‍वास दाखवण्यात आला. माझ्या वडीलांना किंवा माझ्यावर कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही. आम्हाला वाळीत टाकण्यात आले. ते आम्हाला खटकले. स्थानिक नेते आ. सुरुपसिंग नाईक आणि शिरीष नाईक यांनी आम्हाला बर्‍याच गोष्टींमध्ये अडविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या त्रासाला कंटाळूनच मी कॉंग्रेसला रामराम ठोकला असून भाजपाला जय श्रीराम केले.

येणार्‍या काळात भाजपाच्या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नवापूर तालुक्यात भाजपाची झालेली दयनिय स्थिती मजबूत करण्याचे काम करु. कॉंगे्रसमय नवापूर तालुक्याला भाजपामय करणार. पक्ष जी जबाबदारी देईल, ती प्रामाणिकपणे पार पाडीन, असेही श्री.गावित यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या महिनाभरापासून माझी आणि नवनिर्वाचीत भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्याशी भाजपात प्रवेश करण्याबाबत बोलणी सुरु होती. नवापूर तालुक्यात भाजपाची कमकुवत ताकद वाढली पाहिजे, यासाठी मी भाजपात यावे, अशी विजय चौधरी यांची इच्छा होती. त्यांच्या विनंतीला मान देवून मी भाजपात येण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत मुंबईत आपण भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याचेही श्री.गावित यांनी सांगितले.

विधानसभेत उमेदवारीची मागणी करणार? 

पाच वर्षात नवापूरची परिस्थिती काय आहे, हे सर्वांना माहिती आहे. नवापूर तालुक्याचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न करणार, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक कामे केली आहे, परंतू संपुर्ण तालुक्यात राहिलेली विकास कामे पूर्ण करण्यासाठी विधानसभेत भाजपाकडून उमेदवारीची मागणी करणार असल्याचेही श्री.गावित यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!