आग लावून डेरेदार वृक्षांची कत्तल : तळोदा तालुक्यात वृक्षतोडीची नामी शक्कल

0
मोदलपाडा, ता.तळोदा |  वार्ताहर  :  सातपुडयातील व सातपुड्याच्या पायथ्याशी असणार्‍या परिसरातून डेरेदार वृक्षांची कत्तल करण्यासाठी समाज कंटकांनी  डेरेदार वृक्षांना आगी लावून त्यांची कत्तल केली जात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

सध्या सातपुडा पर्वतरांगांच्या जंगलात व सातपुड्याच्या पायथ्याशी असणार्‍या वनपरिक्षेत्रातील वनांचे अस्तित्व नाममात्र राहिले आहे.

आहे ते वन व झाडे टिकवण्याचे कडवे आव्हान वनविभागापुढे आहे. वनविभागही आपल्या परीने वनांचे जतन व संवर्धनाचे काम करत असतो.

मात्र लाकूड तस्करांनी वनविभागाला चकमा देण्यासाठी विविध नामी शक्कल लढववितांना दिसून येतात. त्याचाच एक भाग म्हणून उन्हाळ्यात झाडांची कत्तल करणार्‍यांकडून डेरेदार वृक्षांना आगी लावण्याचे प्रकार सर्रास होताना दिसत आहेत.

अशी डेरेदार वृक्ष ही रस्त्यालगत असल्याने त्यांना शिकार बनविणे लाकूड तस्करांसाठी सहज व सोपे नसते. त्यामुळे अश्या डेरेदार वृक्षांना खोडाच्या बुंध्याला आग लावण्यात येते.

आतून आग लावलेली अशी झाडे जळत असतात. ती कमकुवत झाली की कोसळतात.

ऐन उन्हाळयातील एप्रिल व मे महिन्यात हे प्रकार सर्रास होतांना दिसून येतात. या महिन्यात मोठ्या प्रमाणात ऊन असते व झाडांचे खोडही बर्‍याच प्रमाणात शुष्क झालेली असतात.

दुपारी थोड्या प्रमाणात आग लावली तरी ती झपाट्याने पेट घेते व लवकर कोसळतात.

त्यामुळे उन्हाळ्यात या प्रकारात वाढ झालेली दिसून येत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. कोसळलेल्या झाडांचे लाकूड टप्प्याटप्याने आग लावणारी मंडळी लांबवित असते.

आग लावणारे हे प्रकार अज्ञातमाथेफिरु किंवा समाजकंटकांकडून होत असल्याचे प्रथमदर्शनी वाटत असल्याने या प्रकरांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.

मात्र अश्या पद्धतीने आग लावून वृक्षांची कत्तल करणार्‍यांच्या टोळ्या सक्रिय असण्याची शंका आता निर्माण होऊ लागली आहे.

मागील आठवड्यात याचा प्रत्यय तळोदा तालुक्यातही मोड गावालगत एका शेतात असणार्‍या झाडाबाबत आला. तिथे असणार्‍या एका डेरेदार चिंचेच्या झाडाच्या खोडाला अज्ञातांनी आग लावली.

यामुळे त्या झाडाचे खोड आतून पूर्णपणे जळून कोसळले. मंगळवारीदेखील प्रकाशा-डामरखेडा रस्त्यालगत असणार्‍या डेरेदार वृक्षांला आग लावण्यात आली. एका सुज्ञ प्रवाश्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना फोन करून त्याची माहिती दिली.

बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनीदेखील याबाबत तत्परता दाखवून झाडाला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन बंबाची गाडी पाठवून आग विझवली व झाडाला वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मोठ्या प्रमाणात झाडांच्या बुंध्याला आग लावून झाडांची कत्तल होण्याचे प्रकार सुरू असताना वन विभाग याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.या बाबीकडे वनविभागाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

हा प्रकार अज्ञात माथेफिरू किंवा समाजकंटकांकडून होत आहेत का यामागे लाकूड तस्करांची टोळी सक्रिय आहे, याचा शोध घेऊन झाडांचे व पर्यावरणाचे संरक्षण करावे,अशी अपेक्षा वृक्षप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

*