शिवार संवाद कार्यक्रमात शेतकर्‍यांनी मांडले वीज व पाण्याबाबत गार्‍हाणे

0
शहादा / शिवार संवाद कार्यक्रमाच्या शुभारंभनिमित्त नांदरखेडा ता. शहादा येथे शेतकर्‍यांशी संवाद साधण्याकरीता आलेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांच्यासमोर वीज व पाणी प्रश्नावर शेतकर्‍यांनी समस्यांच्या पाढाच वाचला.
पाणी असूनही शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पाणी जात नसल्याचे पाहून दानवे देखील अंचबित झाल्याचे दिसले.
शेतकर्‍यांसाठी असलेल्या योजना व कामांची माहिती थेट बांधापर्यंत मिळत नसल्याने शेतकर्‍यांनी कैफीयत मांडली. एक हजार कोटी खर्चुन प्रकाशा, सुलवाडे, व सारंगखेडा बॅरेज बांधले.
त्यात पाण्याचा मोठा साठा असूनही उपसा सिंचन योजना कार्यान्वित न झाल्यामुळे या पाण्याचा शेतकर्‍यांना काहीच फायदा होत नाही उलट गुजरातकडे पावसाळयात पाणी सोडून दिले जाते.
जर या तिन्ही बॅरेजसचे पाणी शेतकर्‍यांना मिळाले असते तर एक लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली आले असते. याबाबत शासनाने तातडीने उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्याची मागणी केली.

खरीप हंगामासाठी जिल्हा बँकेने कागदावर कर्ज मंजूर केले आहे. त्यासाठी शेतकर्‍यांना डेबीट कार्डही दिले आहेत. मात्र, राष्ट्रीकृत बँकांच्या एटीएमनमध्ये ठणठणाट असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

मुद्रा योजनेतंर्गत जिल्ह्यात केवळ दोन टक्के कर्ज वाटप झाले. मग ही योजना शेतकर्‍यांसाठी किती फलदायी आहे. असा सवालही शेतकर्‍यांनी उपस्थित केला.

दरा राणीपुर, चिरडे, रहाटयावड धरणांमध्ये 60 टक्के गाळ आहे. त्यामुळे पाणीसाठा पूर्ण क्षमतेने जमा होत नाही. पाणी वाहून जाते याकरीता शासनाच्या उपाययोजना होणे आवश्यक आहे. विजेच्या समस्याही मोठया प्रमाणात असल्याचे सांगून शेतकरंनी समस्यांचा पाढाच खा.दानवेंसमोर वाचला.

भाजपा अंतर्गत गटबाजीमुळे शिवारसंवाद कार्यक्रमाचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले. आ.उदेसिंग पाडवी यांनी ब्राम्हणपुरी येथे खा.रावसाहेब दानवे शिवार संवाद कार्यक्रम आयोजित केला.

तर दुसरा कार्यक्रम नांदरखेडा येथे खा.डॉ. हिना गावीतांनी आयोजित केला होता. आ. पाडवींच्या कार्यक्रमात भाजपात पुन्हा गटबाजी उफाळून आल्याचे दिसून आले.

त्याचा प्रत्यय नांदरखेडा येथील कार्यक्रमातही दिसून आला. येथील शेतकर्‍यांची अल्प उपस्थिती खटकणारी होती. त्यामुळेच या कार्यक्रमाचा फज्जा डाल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.

LEAVE A REPLY

*