पोटनिवडणुकीसाठी मतदान नसतांनाही बँका बंद

0
नंदुरबार / पालिकेच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये पोटनिवडणूक लागू झाल्याने आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र ही पोटनिवडणूक अर्ज भरणा केल्यानंतर बिनविरोध झाल्याने प्रत्यक्ष मतदान झाले नाही. मात्र, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी बँकांना मात्र सुट्टी मिळाल्याने नागरीक त्रस्त झाले होते.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 24 मे रोजी प्रभाग क्रमांक दोनमधील नगरसेवकाच्या रिक्त पदासाठी मतदान घेण्यात येणार होते.
परंतु या प्रभागात नगरसेवक पदासाठी एकच अर्ज आल्याने छाननीअंती उमेदवार हरीष मंगा चौधरी हे बिनविरोध निवडणून आले होते.
यामुळे पोटनिवणूकीचा कार्यक्रम रद्द झाला होता. मात्र निवडणूक आयोगाने देशातील इतर पोटनिवडणूक कार्यक्रमांसोबतच हा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर त्या-त्या क्षेत्रातील बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.

ही सुट्टी नंदुरबार येथे 24 मे रोजी कायम ठेवण्यात आली होती. बँकांनी मंगळवारी रात्री आठ वाजेपर्यंत याबाबत नव्या निर्णयाबाबत वरिष्ठ कार्यालयांकडे संपर्क करून पाहिला होता. मात्र तेथेही सुट्टीची माहिती असल्याने अखेर आज शहरातील राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांना सुट्टी जाहीर झाली होती.

शहरातील स्टेट बँक, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ बडोदा यासह विविध राष्ट्रीयकृत बँका सकाळपासून बंद असल्याने येणारे बँक ग्राहक बुचकाळ्यात पडले होते.

11 वाजूनही शटर वर जात नसल्याने अनेकांनी अधिकारी कर्मचार्‍यांना फोनवर विचारणाही केली होती. त्यांनी सुट्टी असल्याची माहिती दिल्यानंतर अनेकांनी आश्चर्य तर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

याबाबत नंदुरबार येथील स्टेट बँकेचे प्रभारी मुख्य व्यवस्थापक दिवाकर वाणी यांच्याकडून माहिती घेतली असता, त्यांनी बँकेला सुट्टी असल्याचे आदेश वरीष्ठ शाखांकडून प्राप्त झाले होते. त्यानुसार शहरातील सर्व शाखा बंद ठेवण्यात आल्या असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

*