नंदुरबार जि.प. व पं.स.चे आरक्षण जाहीर : शहादा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एक गट व दोन गणात वाढ, 56 पैकी 28 गट महिलांसाठी राखीव

0

नंदुरबार ।  प्रतिनिधी :  येत्या डिसेंबर महिन्यात होवू घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर आज गट-गणांची आरक्षण सोडत काढण्यात आली.

यंदा शहादा तालुक्यात एक गट व दोन गण वाढवण्यात आल्याने आता जिल्हा परिषदेच्या 56 तर पंचायत समितीच्या 112 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. या 56 गटांपैकी 44 गट अनुसूचित जमाती, 11 गट नागरिकांचा मागास प्रवर्ग तर एक जागा अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आले आहेत.

त्यातही अनुसूचित जमातीचे 22 गट, नागरिकांचा मागास प्रवर्गाचे 5 गट तर अनुसूचित जातीचा गट असे 28 महिलांसाठी राखीव आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकही जागा सोडण्यात आलेली नाही. दरम्यान, विद्यमान अनेक जि.प.सदस्यांचे गट राखीव झाल्याने त्यांची पंचायत झाली आहे.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात आज जिल्हा परिषदेच्या गटाची आरक्षण सोडत काढण्यात आली. महेक परदेशी या चिमुकलीच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठयांची सोडत काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांच्यासह राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या 56 गटांचे काढण्यात आलेले आरक्षण असे- अक्कलकुवा तालुक्यातील भांग्रापाणी, पिंपळखुटा, वेली व होराफळी हे गट अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गाकरीता आरक्षीत झाले आहे. भगदरी, मोरंबा, रायसिंगपूर, गंगापूर हे गट अनुसूचित जमाती, तर खापर व अक्कलकुवा हे गट नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले आहेत.
अक्राणी तालुक्यातील रोषमाळ खुर्द हा एक गट अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. तर तोरणमाळ, राजबर्डी, कात्री, असली, मांडवी बु।, घाटली हे गट अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहे.

तळोदा तालुक्यातील अमोनी, धनपूर, बोरद व आमलाड गट अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गासाठी तर बुधावल गट अनुसूचित जमाती प्रवर्ग आरक्षित करण्यात आले आहे.

शहादा तालुक्यातील कन्साई, सुलतानपूर, खेडदिगर, मंदाणे, कुढावद, मोहिदे त.श., प्रकाशा हे गट अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. चांदसैली, सारंगखेडा विभागासाठी अनुसूचित जमाती प्रवर्ग, म्हसावद, पाडळदे बु। गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तर लोणखेडा व कहाटूळ गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षीत करण्यात आला आहे. वडाळी हा एकमेव गट अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गासाठी राखीव झाला आहे.

नंदुरबार तालुक्यातील पातोंडा, नांदर्खे, धानोरा, कोठली खु गट अनुसूचित जमाती स्त्री, कोळदे, रनाळा, मांडळ गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, खोंडामळी, कोपर्ली गट नागरिकांचा मागासप्रवर्ग व आष्टे गट अनुसूचित जमातीसाठी आरक्षीत करण्यात आला आहे.

नवापूर तालुक्यातील उमराण, भरडू, निजामपूर, खांडबारा, चितवी, चिंचपाडा, रायंगण, बिलमांजरे गट अनुसूचित जमाती तर मोग्राणी व करंजी बु। गट अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गासाठी आरक्षीत झाला आहे.

दरम्यान, सन 2013 च्या निवडणूकीसाठी जिल्हयात जिल्हा परिषदेचे 55 गट तर पंचायत समितीचे 110 गण होते. यंदा मात्र, एक गट आणि दोन गण वाढले आहेत. शहादा तालुक्यातील कुढावद हा नवीन गट तयार करण्यात आला असून तो अनुसूचित जमाती स्त्री राखीव करण्यात आला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अनेक गट व गणांच्या आरक्षणात मोठया प्रमाणावर बदल झाला आहे.

त्यामुळे अनेक दिग्गज जि.प.सदस्यांना त्याचा फटका बसणार आहे. अनेक गट व गण हे महिला आरक्षित झाले असल्याने सदस्यांना आता आपल्या सौभाग्यवतींचे नशिब आजमावे लागणार आहे.

पंचायत समिती नंदुरबार

येथील पंचायत समितीच्या 20 गणांसाठी आज तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी एकुण 20 गणांपैकी सात गण अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित असणार आहेत़. नंदुरबार येथील तहसील कार्यालयात प्रांताधिकारी वान्मती सी, तहसीलदार नितीन पाटील, नायब तहसीलदार गोपाल पाटील यांच्या उपस्थितीत नंदुरबार पंचायत समितीच्या 20 गणांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली़

यावेळी कोपर्ली, रनाळा, वैंदाणे, दुधाळे, मांडळ, धानोरा, कोठली खु हे गण अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. खोंडामळी, कोरीट, घोटाणे, खामगाव, पावला व वाघाळे हे गण अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले आहेत. पातोंडा गण नामाप्र महिला प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. गुजरभवाली, होळतर्फे हवेली, नांदर्खे हे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत. तसेच आष्टे व कोळदे हे गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहेत.

शहादा पंचायत समिती
शहादा । ता.प्र.-
शहादा पंचायत समितीच्या 28 गणांकरिता आज तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. अनुसूचित जातीकरिता वडाळी गण आरक्षित झाला असून विद्यमान पंचायत समितीच्या 26 गणांची संख्या दोनने वाढून 28 झाली आहे. अनरद व कोंडावळ या दोन नवीन गणांची भर पडली असून जिल्हा परिषद गटांची संख्याही एकने वाढून 14 झाली आहे.

आरक्षण सोडतच्या जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार आज शहादा प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार मनोज खैरनार, नायब तहसीलदार डॉ.उल्हास देवरे, आनंद महाजन, किशोर भांदुर्गे, सामाजिक व राजकिय पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत एका लहान मुलीच्या हस्ते चिट्ठी काढून आरक्षण सोडत काढण्यात आली.

शहादा तालुक्यात एकूण 14 जिल्हा परिषद गट निर्माण झाले आहेत. 28 पंचयात समिती गण आहेत. यात 17 जागा या अनुसूचित जमातीसाठी, 1 जागा अनुसुचित जाती, 8 जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग व 2 जागा या सर्वसाधारण वर्गासाठी आरक्षित केल्या आहेत. सध्याच्या जिल्हा परिषदगटांची संख्या 13 असून त्यात आणखी एका गटाची भर पडून 14 झाली असल्याने पंचायत गणांची संख्याही दोनने वाढून 26 ऐवजी 28 झाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना 50 टक्के आरक्षण आहे त्यानुसार 14 जागा या महिलांना आरक्षित झाल्या आहेत. यावेळी काढण्यात आलेल्या सोडतीत शहादा तालुक्यातील कन्साई, तलावडी, सुलवाडे, कुढ़ावद, मोहिदे त.श., सारंगखेड़ा, अनरद, कळंबू, तोरखेड़ा हे गण अनुसूचित जमाती स्त्री राखीव झाले आहेत. राणीपूर, म्हसावद, वडगांव, कोंढावळ, लोणखेड़ा, वैजाली, कहाटूळ, प्रकाशा हे गण अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले आहेत. सुलतानपूर, खेडदिगर, मंदाणे, मोहिदे त.ह., हे गण नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव झाले आहेत.

ब्राह्मणपूरी गण सर्वसाधारण तर चांदसैली गट सर्वसाधारण महिला राखीव झाला आहे. डोंगरगांव, जावदे त.बो., पाडळदे बु, शेल्टी हे गण नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव झाले आहेत. वडाळी हा एकमेव गण अनुसुचित जातीसाठी राखीव आहे.
आज काढण्यात आलेल्या गट गण आरक्षणामुळे शहादा तालुक्यातील राजकीय गणित बदलणार असून अनेक मातब्बरांचे गट,गण आरक्षित झाल्याने मोठी पंचाइत झाली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीने जिल्ह्यात निवडणुकीचे राजकीय वातावरण तापणार आहे. राजकीय पक्षांचे पदाधिकारी आता निवडणुकीच्या तयारीसाठी लागणार आहेत.

पंचायत समिती नवापूर

नवापूर । प्रतिनिधी-
येथील तहसिल कार्यालयात आज पंचायत समितीच्या 20 जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यात 19 जागा अनुसूचित जमातीसाठी तर एक जागा सर्वसाधारण गटासाठी आरक्षित करण्यात आली आहे. याशिवाय 10 जागा अनुसूचित जमाती महिला राखीव आहेत. तालुक्यातील उमराण, नवागाव, श्रावणी, मोग्राणी, ढोंग, चितवी, हळदाणी, रायंगण, कोळदा हे गण अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले आहेत. भरडू, वडफळी, निजामपूर, करंजाळी, खांडबारा, चिंचपाडा, बिलमांजरे, झामणझर, करंजी बू, नागझरी हे गण अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षीत झाले आहेत. तर तालुक्यातील एकमेव विसरवाडी गण सर्वसाधारण आहे.

तळोदा पंचायत समिती

बोरद । वार्ताहर – तळोदा येथे आज आगामी पंचायत समिती निवडणुकांसाठी पंचायत समिती सदस्यांच्या 10 गणासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. बोरद गण सर्वसाधारण तर 5 गण अनु जमाती स्त्री राखीव उर्वरित 4 गण अनु जमातीसाठी राखीव झाले आहेत.

आज तळोदा येथे प्रशासकीय इमारतीत पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2018 साठी तळोदा पंचायत समिती गणाच्या आरक्षण सोडतीसाठी विशेष सभा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर खांदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी एका शाळकरी मुलाच्या हस्ते चिठ्ठ्या काढून 10 गणांची आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात अमोनी गण-अनु जमाती, अमलपाडा- अनु जमाती स्त्री, धनपूर- अनु जमाती स्त्री राखीव, रांझणी- अनु जमाती, बोरद- सर्वसाधारण, मोड-अनु जमाती, आमलाड – अनु जमाती, तर्‍हावद – अनु जमाती स्त्री राखीव, बुधावल-अनु जमाती स्त्री राखीव, नर्मदानगर-अनु जमाती स्त्री राखीव अशी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.

यावेळी पं.स.उपसभापती दीपक मोरे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष बळीराम पाडवी, दिवाकर पवार, सरपंच प्रवीण वळवी, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश ठाकरे, भाजप तालुकाध्यक्ष, राजेंद्र राजपूत, युवा मोर्च्याचे गोपीनाथ पवार, चंदन पाडवी, आनंद पाडवी, संदीप वळवी, रुबाबसिंग ठाकरे, मंगेश पाटील, नाथ्या पावरा आदींसह अनेक सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. आरक्षण सोडतीसाठी नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, रीनेश गावित, शिरस्तेदार कोकणी, मंडळ अधिकारी ए.जे.वळवी, लिपिक बी.बी.मराठे आदींनी परिश्रम घेतले.

अक्कलकुवा पंचायत समिती

अक्कलकुवा । प्रतिनिधी-
अक्कलकुवा पंचायत समितीच्या 20 गणांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली. यात दोन जागा सर्वसाधारण, एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग वगळता सर्वच जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्या आहेत.

आज अक्कलकुवा येथील तहसिल कार्यालयात काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत सिंदुरी, पिंपळखुंटा, वडफळी, वेली, पेचरीदेव, मेवास अंकुशविहिर, खापर, अक्कलकुवा 1, हे गण अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहेत. मोलगी, भगदरी, डाब, ओहवा, होराफळी, मोरंबा, रायसिंगपूर, अक्कलकुवा 2, सिंगपूर बु हे गण अनुसूचित जमाती महिला राखीव झाले आहेत. भांग्रापाणी व गंगापूर हे गण सर्वसाधारण तर कोराई हा गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव झाला आहे.

अक्राणी पंचायत समिती

अक्राणी येथील तहसिल कार्यालयात आज तहसिलदार श्याम वाडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत पंचायत समितीच्या 14 गणांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी सर्वच जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव करण्यात आल्या असून त्यापैकी 7 जागा महिला आरक्षित आहेत. रोषमाळ खु., तोरणमाळ, त्रिशुल, मुंदलवड, सिसा, घाटली, बिजरी हे अनुसूचित जमाती तर माळगेंदा, राजबर्डी, धनाजे बु, कात्री, असली, मांडवी, गोरांबा हे गण अनुसूचित जमाती महिला राखीव झाले आहेत.

LEAVE A REPLY

*