विवाहितेची ‘आत्महत्या नव्हे हत्याच’

0
नंदुरबार / अक्कलकुवा तालुक्यातील कौलवीमाळ येथील माहेर असलेल्या विवाहितेची हत्या केल्याचा संशय व्यक्त करीत आरोपींची नार्को टेस्ट करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बिरसामुंडा सेवा आदिवासी सेवाभावी संस्थानतर्फे करण्यात आली आहे.

याबाबत अक्कलकुवा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, अक्कलकुवा तालुक्यातील कौलवीमाळ येथील भरत रावजी तडवी यांची मुलगी मनिषा उर्फ मांगी हिचा विवाह दोन वर्षापूर्वी कोठली येथील देवजी संपा पाडवी याच्याशी झाला होता.

विवाहानंतर देवजी मनिषाला सातत्याने मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी देत होता. दि.13 मे रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास मनिषाने कोठली येथून भ्रमणध्वनीने सासरे व नवरा जीवे ठार मारण्याची धमकी देत असल्याचे वडील भरत तडवी यांना कळविले.

तसेच मारहाण करून माझा पाठलाग करीत असून ते मला ठार मारतील, असे भरत तडवी यांना सांगितले. दुसर्‍या दिवशी भरत तडवी नातेवाईकांसोबत कोठली येथे गेले असता मनिषा व तिचा पती देवजी पाडवीही घरी नव्हते.

स्थानिकांना याबाबत विचारपूस केली असता याबाबत त्यांना काहीही माहिती नसल्याने त्यांनी सांगितले. भरत तडवी नातेवाईकांसोबत मुलीचा शोध घेण्यासाठी गेले.

सर्वत्र शोध घेवूनही ती आढळून आली नाही. अखेर तडवी यांनी मोलगी पोलीसात मनिषा हरविल्याची खबर दिली. त्यानंतर दि.15 मे रोजी सकाळी 7 वाजेच्या कुवा गावाच्या शिवारात खोल दरीत झाडाच्या फांदीस ओढणीने गळफास घेतल्याच्या अवस्थेत मनिषा आढळून आली.

याबाबत भरत तडवी यांनी मोलगी पोलीसात देवजी पाडवी व संपा पाडवी यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबतचा गुन्हा दाखल केला आहे.

परंतु मनिषाने आत्महत्या नव्हे तर तिची क्रुरपणे हत्या करण्यात आली असून झाडावर टांगण्यात आले असून संबंधीत संशयित आरोपींची नार्को टेस्ट करून कठोर कारवाई करावी व तडवी कुटुंबियांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर रुपसिंग वसावे यांचे नाव आहे.

LEAVE A REPLY

*