रंगावली धरणावरील लोकसहभागातून गाळ काढण्याच्या उपक्रमाची जिल्हाधिकार्‍यांकडून पाहणी

0
नवापूर |  प्रतिनिधी :  नवापूर तालुका दैनिक पत्रकार संघ व नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने रंगावली धरणातून गाळ काढण्याचा उपक्रम गेल्या वर्षांपासून सुरू आहे.

यातून भूजल पातळी व शेतकर्‍यांची जमीन सुपीक झाली आहे. यातून भविष्यात नवापूर शहरातील पाणी टंचाई दूर होणार आहे. लोकसहभागातून गाळ काढण्याचा उपक्रमाची पाहणी करण्यासाठी रविवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नवापूर तालुक्यातील नागझरी गावातील रंगावली धरणाला भेट दिली.

यावेळी दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत पाटील यांच्यासह पदाधिकार्‍यांनी उपक्रमाचा लेखाजोखा सादर करण्यात आला. ४ मे पासून ते आजपर्यंत १ हजार १५० ट्रॅक्टर गाळ काढण्यात आला.

लोकसहभागातून गाळ काढण्याचा मोहिमेला अनेक व्यापारी मंडळींनी स्वतःचे जेसीबी निशुल्क देऊन मोठे योगदान दिले आहे.

यावेळी आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरिषकुमार नाईक यांनी ५१ हजारांची देणगी उपक्रमासाठी जाहिर केली तर नगरसेवक आरिफभाई बलेसरिया यांनी २५ हजारांची रक्कम देण्याचे कबुल केले.

अभियंते बबनराव जगदाळे यांनी संघाला जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पाच हजार रुपये रोख दिले. यासह नवापूर शहरातील व्यापारी, राजकीय, सामाजिक, नागरिकांनी हजारो रूपयांची देणगी दिली आहे.

जल अभिनयासाठी नवापूर शहरासह तालुक्यातून मोठे योगदान मिळत आहे. या पाहणी कार्यक्रम दरम्यान नवापूर शहरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शेतकर्‍यांना आपली जमीन सुपीक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गाळ काढून शेतात टाकण्याचे आवाहन केले. तसेच अधिकार्‍यांना उपक्रम यशस्वी करण्यासाठी सुचना दिल्या. तसेच परिसरातील ग्रामस्थांची चर्चा केली.

रंगावली धरणातून गाळ काढण्याचा उपक्रमाची पाहणीसाठी जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, आदिवासी साखर कारखान्याचे चेअरमन शिरिषकुमार नाईक, नगराध्यक्षा रेणुका गावित, नगरसेवक आरिफभाई बलेसरिया, माजी नगरसेवक विनय गावित,पंचायत समिती सभापती सविता गावित, तहसीलदार प्रमोद वसावे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, जिल्हा चिटणीस एजाज शेख, विरोध पक्षाचे नेते नरेंद्र नगराळे, राजेश अग्रवाल, दिपक अग्रवाल, सुभाष अग्रवाल, कल्पेश अग्रवाल, मधुकर पाटील, दिलीप कुलकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप बुवा, जितेंद्र सपकाळे, हेमंत पाटील, नागझरी सरपंच रामकू गावित, रवि गावित अन्य अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

ड्रोनद्वारे चित्रिकरण

नवापूर तालुका दैनिक पत्रकार संघ व नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभागातून गाळ काढण्याचे काम सुरू आहे. याची प्राथमिक माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली आहे.

त्या अनुषंगाने तहसीलदार प्रमोद वसावे, अध्यक्ष हेमंत पाटील, प्रा.इद्रीस पठाण, मंगेश येवले यासह अन्य पदाधिकारी व सदस्य यांनी उपक्रमाचे नियोजन केले आहे.

तयार झालेली चित्रफित थेट मुख्यमंत्री कार्यालयात सादर करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन टप्प्यात चित्रफित तयार करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*