नंदुरबारात पुढील वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालय

0
नंदुरबार / सन 2018 मध्ये नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ.प्रविण शिनगारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ.प्रविण शिनगारे म्हणाले, सन 2012-13 मध्ये नंदुरबार येथे वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा झाली होती. त्यावेळी 400 कोटीच्या प्रस्तावास मंजूरी मिळाली होती.

परंतू तत्कालीन लोकप्रतिनिधींनी सदर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत न बांधता प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यात यावा अशी गळ घातली.

यात 6 ते 7 टक्के जास्तीचा खर्च लागणार होता. म्हणून तेव्हा हा प्रकल्प रखडला होता. परंतू आता मुख्यमंत्र्यांनी याविषयी लक्ष घातल्याने वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न मार्गी लागला असून येत्या वर्षात म्हणजेच सन 2018 ला वैद्यकीय महाविद्यालयाची पहिली बॅच सुरु होणार आहे.

जुलैमध्ये होणार्‍या पावसाळी अधिवेशनात या महाविद्यालयाची पुरवणी मागणी करण्यात येईल, त्यानंतर ऑगस्ट महिन्यात निविदा प्रक्रिया सुरु होणार आहे.

मात्र, आता या प्रकल्पाचा खर्च 600 कोटीवर गेला आहे. पहिल्या बॅचसाठी आवश्यक ती सुविधा, मशिनरी सर्व जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहे.

त्यानंतर सन 2019 मध्ये सर्व बॅचेस सुरु होतील, असे स्ट्रक्चर उभे करण्यात येणार आहे. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 2600 डॉक्टर्स आहेत. त्यापैकी 400 डॉक्टरांना बढतीची तुर्तास संधी नाही, अशा डॉक्टरांना बढती देवून नंदुरबारसह इतर ज्याठिकाणी नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरु होणार आहे, त्याठिकाणी सामावून घेण्यात येणार आहे.

त्यामुळे येत्या वर्षात नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरु होणार आहे, असेही डॉ.शिनगारे म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, आरोग्यदूत रामेश्वर नाईक, संदीप जाधव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*