आश्रमशाळेतील विद्यार्थी मृत्यूप्रकरणी तहसिलदारांसह प्रकल्प अधिकार्‍यांवर हल्ला

0
नंदुरबार | प्रतिनिधी :  सलसाडी ता.तळोदा येथील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी आज तळोदा येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विनय गौडा व तहसिलदार योगेश चंद्रे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात श्री.गौडा यांना गंभीर मार लागला असून दोन्ही अधिकार्‍यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, आज जिल्हा परिषद व पंचायत समिती गट-गणांची आरक्षण सोडत असल्याने तळोदा येथे निवडणूक उपजिल्हाधिकारी सुधीर खांदेे यांच्या अध्यक्षतेखाली सोडत काढण्यात आली. याप्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, सलसाडी ता.तळोदा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी सचिन चंद्रसिंग मोरे याला आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास विद्युत डीपीचा शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आश्रमशाळेत कुठल्याही सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने या विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला, अशी भावना होवून संतप्त ग्रामस्थांनी आश्रमशाळेत ठिय्या मांडला. जोपर्यंत प्रकल्प अधिकारी येत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्याचा मृतदेह उचलणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. त्यामुळे सकाळी १० वाजेच्या सुमारास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विनय गौडा, तहसिलदार योगेश चंद्रे, पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, अधिकारी येताच ग्रामस्थांनी हातातील लाठयाकाठयांनी श्री.गौडा यांच्यावर हल्ला केला. यात त्यांना मानेला, पाठीला व पायाला मोठया प्रमाणावर दुखापत झाली आहे. तर तहसिलदार योगेश चंद्रे यांनादेखील पायाला दुखापत झाली आहे. या हल्ल्यात पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक यांनादेखील मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी श्री.गौडा व श्री.चंद्रे यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले. या प्रकरणी दुपारपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.

दरम्यान या घटनेचा राजपत्रित अधिकारी संघटनेचे तीव्र निषेध केला असून संघटनेचे सर्व अधिकारी काळया फिती लावून काम करणार आहेत.

याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी म्हणाले, आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास सलसाडी येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाला. त्यामुळे प्रकल्प अधिकारी विनय गौडा, तहसिलदार योगेश चंद्रे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी हे घटनास्थळी गेले असता त्यांच्यावर संतप्त ग्रामस्थांनी हल्ला केला. यात दोन्ही अधिकार्‍यांना तसेच पोलीस अधिकार्‍यांनादेखील मार लागला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून या घटनेच्या चौकशीचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले असून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

LEAVE A REPLY

*