कोळदा येथील कृषि विज्ञान केंद्रात मिरची पिकावर प्रशिक्षण

0
नंदुरबार । दि.31 । प्रतिनिधी-नंदुरबार जिल्ह्याची ओळख असणार्‍या मिरची या पिकावरील एक दिवसीय प्रशिक्षणाची कृषि विज्ञान केंद्रात नुकतीच यशस्वीरित्या सांगता झाली.
या कार्यक्रमाला नेटाफिम इंडिया प्रा.लि. चे उपव्यवस्थापक वाय.के.गिरासे, बारीपाडा या आदर्श गावाचे शिल्पकार चैत्राम पवार, शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त हिम्मत माळी यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली. या प्रसंगी नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख मिरची उत्पादक उपस्थित होते.

कृषि विज्ञान केंद्राचे विषय तज्ञ आर.एम. पाटील यांनी प्रास्ताविकात मिरची पिकाची सद्यस्थिती तसेच यावर्षी मिरचीचे क्षेत्र कमी होण्याच्या कारणांचा सविस्तर उहापोह केला.

गेल्या हंगामात मिरची पिकाला अपेक्षित दर न मिळणे तसेच मागील दोन वर्षापासून होणारा पांढर्‍या माशीचे थैमान व यामुळे मिरची पिकावर आटोक्यात न येणारा बोकड्या सारख्या विषाणूजन्य रोग या सर्व कारणांमुळेच मिरची उत्पादक मिरची पिक सोडून कापसाकडे वळल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

याप्रसंगी श्री. गिरासे यांनी मिरचीच्या भरघोस उत्पादनासाठी शेतकर्‍यांना एकात्मिक पीक व्यवस्थापनाकडे लक्ष देण्याचे सूचित केले.

मिरची पिकाच्या यशस्वीतेसाठी रोपांच्या लागवडीच्या तीन महिने अगोदरपासून तयारी करणे गरजेचे असते. मिरचीसाठी उंच गादी वाफा तंत्रज्ञान योग्य असून यासाठी रोपांच्या लागवडीच्या किमान 15 दिवस अगोदर गादी वाफे तयार करावेत.

अन्नद्रव्य व्यवस्थापनात कर्ब, हायड्रोजन, प्राणवायू या मुख्य घटकांसोबतच सूर्यप्रकाश महत्वाचा असून यासाठी मिरची पिकाची लागवड उत्तर-दक्षिण करणे आवश्यक आहे.

मिरची पिकाच्या मूळयांच्या विस्तार हा जमिनीत 22 सेमी पर्यंत असतो. यामुळे ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन करताना ओलावा तेवढ्या खोलीपर्यंत राहील याची दक्षता घ्यावी जास्त पाणी दिल्यास पाण्यासोबत महत्वाचे अन्नद्रव्ये मुळयांच्या कक्षेबाहेर जातात आणि याचा परिणाम मिरचीच्या वाढीवर व उत्पादनावर होत असल्याचे प्रतिपादन श्री.गिरासे यांनी केले.

पिक संरक्षण तज्ञ पी.सी.कुंदे यांनी मिरची पिकावर येणारे फुलकिडे, लालकोळी, पांढरी माशी तसेच करपा, भुरी, फळसड आदी किड रोगाच्या नियंत्रणासाठी एकात्मिक किड रोग व्यवस्थापनावर विस्तृतवार मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषि विज्ञान केंद्राचे जयंत उत्तरवार, यु.डी.पाटील, आर.आर.भावसार, व्ही.एस.बागल, गिता कदम, राहुल नवले, रजेसिंग गिरासे, कल्याण पाटील, किरण मराठे, कैलास सोनवणे यांचे सहकार्य लाभले.

 

LEAVE A REPLY

*