साखर पेरत चालनी व माय चालनी गंगेवरी

0
नंदुरबार । दि.31 । प्रतिनिधी-‘कानबाई साखर पेरत चालनी व माय चालनी गंगेवरी’ या गाण्याच्या ठेक्यावर ताल धरत नंदुरबार शहरातील हजारो भाविकांनी भरपावसात कानबाईला भावपूर्ण निरोप दिला.
नंदुरबार शहरातील साक्री नाका ते हाटदरवाजा तसेच नवापूर रस्त्यावरील अवलगाझी दर्ग्याच्या पूलाजवळ हजारो महिला-पुरुष, युवक-युवती कानबाईला निरोप देण्यासाठी आलेले होते.
शहरात कानबाईच्या गाण्यांमुळे संपूर्ण आसमंत दणाणून गेला होता. मिरवणूकीत सहभागी झालेल्या हजारो महिला-पुरुष या गाण्यावर धुंद होऊन नृत्य करत होते, त्यामुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते.

भाविकांचा उत्साह अमाप असल्याचेच यावेळी आढळून आले. डी.जे.च्या तालावर नृत्य करण्याबरोबरच महिला व युवतींनी स्वतः ढोल वाजवत या मिरवणूकीत सक्रीय सहभाग घेतल्याचे आढळून आले.

त्याचबरोबर अबालवृद्ध सर्वजण भान विसरुन या गाण्याच्या तालावर ठेका धरत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले. चौरंगावर ठेवलेल्या कानबाईच्या मूर्ती डोक्यावर घेवून हजारो महिलांचा जत्था पाताळगंगेकडे जातांना दिसून येत होता.

सुमारे एक ते दीड किलोमीटरपर्यंत मिरवणूकांची रांग लागलेली दिसून आली. पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त करण्यात आला होता.

आज सकाळपासून पावसाची संततधार सुरु असल्याने त्याचबरोबर मधूनमधून जोरदार सरीदेखील कोसळत असल्याने भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

ठिकठिकाणी नृत्याचे रिंगण तसेच फुगड्यांचे खेळ यामुळे वातावरणात उत्साह दिसून आला. कानबाईला निरोप देतांना भाविक भावविभोर झाल्याचेच चित्र दिसून आले.

यंदा वरुणराजाच्या कृपेने गेल्या दोन वर्षानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात कानबाईचा सण साजरा झाल्याचे चित्र दिसून आले. या मिरवणूकांमुळे आज शहरात अनेक रस्त्यांवर वाहतुक विस्कळीत झालेली होती. त्यामुळी काही वाहनांची कोंडीदेखील झालेली होती.

दुपारी 2 वाजेपर्यंत श्री कानुमातेच्या या मिरवणूका सुरु होत्या. कुठलाही अनुचित प्रकार न घडता मिरवणूका शांततेत व जल्लोषाच्या वातावरणात पार पडल्या.

 

LEAVE A REPLY

*