Wednesday, April 24, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार : कलसाडी शाळेत सर्पमित्राने पकडला साप ; विद्यार्थ्यांच्या मनातून काढली भीती

नंदुरबार : कलसाडी शाळेत सर्पमित्राने पकडला साप ; विद्यार्थ्यांच्या मनातून काढली भीती

नंदुरबार | प्रतिनिधी

परिवर्धे केंद्रातील कलसाडी शाळेतील महिला शिक्षिकांनी सर्पमित्राच्या सहाय्याने शाळेत निघालेला साप जिवंत पकडून त्याला जीवदान तर दिलेच त्यासोबत शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनातील भीतीही घालवली.

- Advertisement -

कलसाडी शाळेला चारही बाजूंनी संरक्षण भिंत आहे. तरीही जवळपास दहा पंधरा दिवसापासून एक पाणदिवळ जातीचा साप शाळेच्या परिसरात दिसायचा. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. हा साप पंधरा दिवसात ३-४ वेळेस दिसला आणि लगेच कुठेतरी लपून बसायचा.

जवळपास चार-साडेचार फुटाच्या या सापाने विद्यार्थ्यांच्या मनात शालेय परिसरात जणूकाही भीतीच निर्माण केली होती. आज हा साप पुन्हा शाळेच्या मागच्या बाजूला विद्यार्थ्यांना दिसला.शाळेचे मुख्याध्यापक रजेवर असल्याने विद्यार्थ्यांनी उपशिक्षिका श्रीमती स्नेहल सर्जेराव गुगळे यांना साप निघाल्याचे सांगितले. त्यांनी तात्काळ स्वतः सापाच्या दिशेने जात श्रीमती मीना पाटील व श्रीमती निर्मला सामुद्रे यांनाही बोलावले.

या सापावर आता आपण व्यवस्थित लक्ष ठेवू आणि सर्पमित्रांच्या सहाय्याने कोणत्याही परिस्थितीत आपण याला आज जिवंत पकडू आणि विद्यार्थ्यांच्या मनातील १५ दिवसापासूनची भिती कोणत्याही परिस्थितीत घालवूच, असा या महिलांनी जणू निश्‍चयच केला होता. याआधीही दोन वेळेस त्या सापाला जिवंत पकडण्याचा प्रयत्न केला होता. पण तो लपून बसायचा. मात्र आज सापावर या महिला शिक्षकांनी पूर्णपणे लक्ष ठेवले.

श्रीमती स्नेहल गुगळे यांनी याआधी कलमाडी त.बो.शाळेवर कार्यरत असतांना सर्पमित्र राजेश ठोंबरे यांच्याकडून साप पकडण्याचे प्रशिक्षण घेतलेले आहे. परंतु आपले १० महिन्याचे बाळ सोबत असल्याने त्यांनी या वेळेस स्वतः साप न पकडता त्यांच्या संपर्कातील शहादा येथील सर्पमित्र राहूल कोळी यांच्याशी फोनवर संपर्क करून त्यांना कलसाडी जि.प.शाळेत बोलावले. शहाद्याहून कलसाडीला सर्पमित्र येईपर्यंत जवळपास वीस-पंचवीस मिनिटे या महिला शिक्षिका सापावर लक्ष ठेवूनच होत्या.

सर्पमित्र आल्यावर काही वेळातच सापाला पकडून त्यांनी ताब्यात घेतले. मग श्रीमती स्नेहल गुगळे यांनीही स्वतः साप हाताळत तो पाणदिवड जातीचा बिनविषारी परंतु अतिशय चपळ व रागीट साप असल्याचे विद्यार्थ्यांना व उपस्थितीतांना सांगत त्याविषयी माहिती दिली. त्याच्या शरिरावरती मऊ खवले,मेहंदी फिक्कट शेवाळी काळ्या आणि लाल रंगामध्ये चौकटी नक्षी, मस्तक मानेपेक्षा मोठे, डोळ्याखाली तितकी रेघ, गोल बाहूली आपल्याबाबत सविस्तर माहितीही दिली. आपल्याला कुठेही व कधीही साप आढळून आल्यास त्याला न मारता सर्पमित्रांना फोन करून बोलवावे मग ते साप पकडून पुढे पुन्हा एखाद्या शेतात सोडून देतात. त्याला स्पर्श झाल्याशिवाय/त्याला आपण त्रासदिल्याशिवाय तो आपल्याला काहीही करत नाही, अशी माहिती शाळेतील उपशिक्षिका श्रीमती मीना पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिली. उपशिक्षिका श्रीमती निर्मला सामुद्रे यांनी साप हा शेतकर्‍याचा मित्र असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थ्यांना कुठेही साप दिसला तर त्याला काहीही न करता लांबून त्यावर लक्ष ठेवावे व मोठ्या व्यक्तींना सांगावे कारण साप विषारी व बिन विषारीही असतात. ते फक्त तज्ञ लोकांनाच समजते. म्हणून सर्वांनी सापापासून लांबच रहावे हे आवर्जून विद्यार्थ्यांना स्पष्ट केले.

श्री.कोकणी, श्री.कलाल व श्रीमती गांगुर्डे यांनी साप पकडण्याची मिशन पुर्ण होईपर्यंत अतिशय सावधगिरीने विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवले. लक्ष केंद्रित करून शाळेतील टिमवर्कमुळे १५ दिवसांपासून शाळेत भितीचे वातावरण निर्माण करणार्‍या या सापाला पकडून शाळेमध्ये व  विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सापाबद्दलची सर्व माहिती जाणून घेतल्यावर शाळेत पकडलेला हा साप शाळेपासून एक किलोमीटर अंतरावरील शेतातील पाण्यात सोडून देण्यात आला.

साप दिसल्यापासून त्याला पकडून शेतात सोडण्याचा जवळ पास अर्धा तास चाललेला हा सर्व कार्यक्रम व त्यात महिला शिक्षकांचा आत्मविश्वास व हिंम्मत पाहून आश्चर्य व्यक्त करत गावक-यांनी शाळेतील महिला शिक्षकांचे विशेष कौतूक केले. तेव्हा शिक्षिका श्रीमती स्नेहल गुगळे मॅडम यांनी उपस्थितांना सांगितले हा तर बिनविषारी पाणदिवळ होता,विषारी ओरिजनल नागाचाही कसा बंदोबस्त करायचा व जिवंत पकडायचा हे ही आम्हाला चांगले माहित आहे. तुम्ही तुमच्या मुलांची अजिबात काळजी करू नका,तुमची मुलेही आमचीच मुले आहे.ती शाळेत पुर्णपणे सुरक्षित रहावी हाच आमचा प्रयत्न राहतो. तुम्ही फक्त मुलांना नियमित शाळेत पाठवा. शाळेतील महिला शिक्षकांचे या धाडसाचे गावत व परिसरात चांगलेच कौतूक होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या