विविध हिंदु संघटनांतर्फेचिनी उत्पादनांची होळी

0
नंदुरबार । दि.29 । प्रतिनिधी-आपल्या राष्ट्राशी शत्रूत्व ठेवणार्‍या देशाने उत्पादीत केलेल्या वस्तू वापरणे वा विकत घेणे म्हणजे शत्रू राष्ट्राला मजबूत करण्यासारखेच असल्याने चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला, असे आवाहन करीत येथील विविध हिंदुप्रेमी संघटनांनी राष्ट्रीय हिंदु आंदोलनाच्या माध्यमातून चिनी उत्पादनांची होळी केली व चीनचा तीव्र निषेधही केला.
बॉम्बस्फोटात सहभाग नसतांनाही चौकशीच्या नावाखाली सतत आठ वर्षे साध्वी प्रज्ञासिंह यांचा छळ करणार्‍यांच्या चौकशीची मागणी करणे, अमरनाथ यात्रेकरुंवर हल्ला करणार्‍या दहशतवाद्यांना पोसणार्‍यांची चौकशी करणे आणि चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालणे या तीन विषयांसाठी नंदुरबार शहरातील सुभाष चौक येथे शुक्रवार दि.28 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता हे आंदोलन करण्यात आले.

हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, विश्वहिंदु परिषद, बजरंगदल, शिव प्रतिष्ठान, बजरंग व्यायाम शाळा, योग वेदांत समिती अशा विविध संघटनांचा यात सहभाग होता.

चिनी ड्रॅगनला युध्दाविना पराजीत करायचे असेल तर, राष्ट्रभावना एक करून स्वदेशी वस्तू वापराचा मार्ग अवलंबणे आणि चीनची आर्थिक कोंडी करणे हाच प्रभावी उपाय होऊ शकतो, असे याप्रसंगी हिंदुस्थान शिव प्रतिष्ठानचे दिलीप ढाकणे पाटील यांनी सांगितले. अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ला हा एकार्थाने देशभरातील हिंदुंच्या अस्मितेवर हल्ला आहे.

भारतवासियांच्या आत्मसन्मानाचा भाग म्हणून केंद्रसरकारने तातडीने या दहशतवादाला पोसणार्‍या राजकीयशक्तींना उघड करावे आणि त्यांच्यावर केंद्रसरकारने कडक कारवाई करावी, अशी मागणी प्रा.डॉ. सतिष बागूल यांनी याप्रसंगी भाषणातून मांडली.

तर हिंदु जनजागृती समितीचे डॉ.नरेंद्र पाटील यांनी निर्दोष व्यक्तीचा छळ केल्यास काय शिक्षा मिळते, याचा धडा देण्यासाठी शासनाने दोषी असलेल्या अधिकार्‍यांवर कडक कारवाई करावी,अशी मागणी मांडत साध्वी प्रज्ञासिंह निर्दोष असतांनाही त्यांचा अनन्वित छळ झाल्याप्रकरणी संतप्त भावना मांडल्या.

सूत्रसंचालन सौ.निवेदिता जोशी यांनी तर आभार प्रदर्शन भावना कदम यांनी केले. वृक्षप्रेमी विठ्ठल मगरे, नरेंद्र तांबोळी, हर्षद पत्की, ललित विसपुते, आनंद मराठे व अन्य पदाधिकार्‍यांनी तसेच सौ.छाया सोनार, आकाश गावित, मयूर चौधरी आदींसह अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभाग घेतला.

 

LEAVE A REPLY

*