खांडबार्‍याजवळ होतोय गुटख्याचा साठा

0
नंदुरबार । दि.01 । प्रतिनिधी-नवापूर तालुक्यातही गुटख्याची दररोज दीड ते दोन कोटी उलाढाल होत असल्याचे दिसून येत आहे. नवापूर हा तालुका महाराष्ट्र व गुजरातच्या सीमेवर वसला असल्याने त्याचा लाभ गुटखातस्कर घेतांना दिसत आहेत.
नवापूर तालुक्यातील खांडबारा गावापासून चार ते पाच कि.मी.अंतरावर गुजरात राज्यातील गावात खांडबारा येथीलच तीन गुटखातस्करांचे मोठे गोडावून आहे. तेथून दररोज पहाटे कोटयावधी रुपयांच्या गुटख्याची तस्करी केली जाते.
महाराष्ट्रात गुटखाबंदी असतांनाही नंदुरबार जिल्हयात दररोज कोटयावधी रुपयांच्या गुटख्याची तस्करी केली जात आहे. नंदुरबार जिल्हा हा गुजरात राज्याच्या सीमेवर वसला आहे. गुजरातमध्ये गुटखा बंदी नाही.

त्यामुळे गुजरात राज्यातून दररोज कोटयावधी रुपयांच्या गुटख्याची नंदुरबार जिल्हयात तस्करी होत आहे. नंदुरबार शहरासह जिल्हयातील जवळपास सर्वच पानटपर्‍यांवर विमलच्या गुटख्याची सर्रासपणे विक्री होत आहे.

विशेष म्हणजे गुटख्याची विक्री ही दुप्पट, तिप्पट किमतीने होत आहे. यातून दररोज कोटयावधी रुपयांची उलाढाल होत आहे. मात्र, गुटखा विक्रीबद्दल कोणतीही कारवाई केली जात नाही.

कारण गुटखातस्करांची मोठी साखळी जिल्हयात कार्यरत झाली आहे. गुटखा तस्करांकडून दरमहा पोलीस विभाग तसेच अन्न व औषधी प्रशासनाचे ‘हित’ जोपासले जाते. त्यामुळेच गुटखा तस्करी अगदी सर्रासपणे सुरु आहे.

नवापूर तालुका हा गुजरात राज्याला लागूनच आहे. हा तालुका सुरत-नागपूर महामार्गावर वसलेला असल्याने या महामार्गावरुन दररोजी कोटयावधी रुपयांच्या गुटखा, रॉकेल, रेशन, लाकड आदींची तस्करी केली जाते.

या तालुक्यात दररोज दीड ते दोन कोटी रुपयांच्या गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गुटखा तस्कर हे नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील रहिवासी असून त्यांचे खांडबारापासून चार ते पाच कि.मी. अंतरावर गुजरात राज्यात असलेल्या एका गावात मोठे गोडावून आहे.

या गोडावूनमध्ये दररोज कोटयावधी रुपयांचा गुटखा उतरवला जातो व तेथूनच दररोज भल्या पहाटे गुटख्याचा पुरवठा केला जातो.

मोटरसायकल, महिंद्रा मॅक्स, महाराष्ट्र व गुजरात महामंडळाच्या बसेस, रिक्षा आदींमधून सर्रासपणे गुटख्याची वाहतूक केली जाते. परंतू कुठलीही कारवाई होत नाही.

विशेष म्हणजे कोटयावधी रुपयांची उलाढाल होत असूनही कागदोपत्री या गुटख्याची कुठलीही नोंद होतांना दिसत नाही. गुटखा तस्करांना जीएसटी लागू नाही काय? असा प्रश्नही यानिमित्त उपस्थित होत आहे.

याबाबत पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांनी कठोर कारवाई करुन गुटखा तस्करी रोखावी अशी मागणी होत आहे. याशिवाय जिल्हयाचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनीही याबाबत लक्ष घालण्याची गरज आहे.

 

LEAVE A REPLY

*