निवडणूक निरिक्षकांची अतिदुर्गम मतदान केंद्रांना भेट

तात्पुरते मतदान केंद्र; चिमलखेडी आणि मणिबेली येथील केंद्राची केली पाहणी!

0
नंदुरबार । नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त केंद्रीय निवडणूक निरीक्षक शाहजान ए. यांनी अक्कलकुवा विधानसभा मतदार संघातील अतिदुर्गम भागात असलेल्या मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. त्यांच्यासमवेत निवडणूक पोलीस निरीक्षक शेखर कुमार होते.

श्री.शाहजान यांनी मोलगी येथील मतदान केद्राला सर्वप्रथम भेट दिली. त्यानंतर त्यांनी पिंपळखुटा मतदान केंद्राची पाहणी केली. गमन बार्ज पाँईंट येथून चिमलखेडी मतदान केंद्राला बार्जमधून प्रवास करीत भेट दिल्यानंतर त्यांनी धनखेडी येथील तात्पुरते मतदान केंद्र शेड आणि मणिबेली येथील केंद्राची पाहणी केली. त्यांनी अधिकार्‍यांसमवेत मतदान केंद्र व्यवस्थेबाबत चर्चा केली.श्री.कुमार यांनी सुरक्षा विषयक आढावा घेतला. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संदीप माळोदे, कार्यकारी अभियंता अनिल पवार, तहसीलदार नितीन देवरे आणि कर्मचारी उपस्थित होते.

निरीक्षकांची मतमोजणी स्थळाला भेट
केंद्रीय निवडणूक निरीक्षक शाहजान ए. यांनी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोदाम परिसरातील मतमोजणी केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.त्यांच्यासमवेत पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, उप जिल्हा निवडणूक अधिकारी सुधीर खांदे होते.त्यांनी मतमोजणी स्थळाच्या ठिकाणची व्यवस्था, तेथील सुरक्षा व्यवस्था, व्हीव्हीपॅट यंत्रातील मोजणी, मतदान यंत्रांची सुरक्षा आदींबाबत आढावा घेतला.श्री.शाहजान यांनी स्ट्राँगरुमला भेट देऊन मतदान यंत्रांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने सुचना दिल्या. मतदानानंतर सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे मतमोजणीपर्यंत या स्ट्राँगरुमध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात येणार आहे.

मतदान कर्मचारी दुसरी सरमिसळ प्रक्रीया पुर्ण
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ अंतर्गत जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात विविध मतदान केंद्रावर नियुक्त मतदान कर्मचार्‍यांची दुसरी सरमिसळ प्रक्रीया (रँडमायझेशन) निवडणूक निरीक्षक शाहजान ए. आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी मंजुळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, उप जिल्हा निवडणूक अधिकारी सुधीर खांदे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी धर्मेंद्र जैन आदी उपस्थित होते.मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचार्‍यांची विधानसभा मतदार संघ क्षेत्रनिहाय सरमिसळ झाल्यानंतर 28 रोजी मतदान केंद्रावरील पथकांना त्यांच्या मतदान केंद्राविषयी कळू शकेल. तोपर्यंत कर्मचार्‍यांना त्यांच्या मतदान केंद्रावरील नियुक्तीविषयी माहिती मिळणार नाही.अक्कलकुवा विधानभा मतदारसंघात 385 पथकातील 1540 कर्मचारी, शहादा 384 पथकातील 1536 कर्मचारी, नंदुरबार 404 पथकातील 1616 कर्मचारी आणि नवापूर विधानसभा मतदारसंघात 377 पथकातील 1508 अशा एकूण 1550 मतदान पथकातील 6200 कर्मचार्‍यांची संगणकीय प्रणालीद्वारे सरमिसळ करण्यात आली. या कर्मचार्‍यांचे दुसरे प्रशिक्षण 20 आणि 21 एप्रिल रोजी होणार आहे. मतदान केंद्रावर निघण्यापूर्वी त्यांना निर्धारीत मतदान केंद्राची माहिती देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*