नंदुरबार, धुळेसह राज्यातील पाच जिल्हा परिषद निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर
Share

नंदुरबार –
राज्यातील नंदुरबार, धुळेसह 5 जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 36 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यासाठी दि. 7 जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार असून दि.8 जानेवारीला मतमोजणी करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी आजपासूनच आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
राज्यातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर या जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 36 पंचायत समित्यांच्या प्रभाग रचना व आरक्षणाची सोडत काढण्याचा कार्यक्रम देण्यात आला होता. सदर निवडणुकांमध्ये मागावर्गीयांसाठी आरक्षित ठेवावयाच्या जागांची टक्केवारी 50 टक्क्यापेक्षा जास्त होत असल्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद व नागपूर खंडपिठात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. याप्रकरणी न्यायालयाने आरक्षणाची कार्यवाही सुरु ठेवावी, परंतु न्यायालयाच्या परवानगीशिवाय निवडणूक कार्यक्रम घोषित करु नये असे आदेशित केले होते.
सदर आदेशानुसार जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या प्रभाग रचना व आरक्षणाची कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून त्यापुढील मतदार यादी तयार करण्याचा टप्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. 5 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूका न झाल्याचे व जुन्याच समित्या अस्तित्वात असल्याचे निर्दशनास आल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची लोकसंख्या सदर आदेशाच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत आयोगास उपलब्ध करुन न दिल्यास पूर्वीच्याच तरतुदीनुसार करण्यात आलेल्या आरक्षणाच्याआधारे निवडणूका घेण्याचे आदेशित केले होते.
त्यानुसार आज दि. 19 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाने राज्यातील नंदुरबार, धुळेसह पाचही जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत येणार्या 36 पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. आजपासून मतमोजणी प्रक्रिया होईपर्यंत संबंधीत जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यानुसार दि.18 ते 23 डिसेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार आहेत. दि.24 डिसेंबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
दि.27 रोजी नामनिर्देशनपत्रांबाबत अपिल करण्याची मुदत राहणार आहे. दि.30 डिसेंबर रेाजी अपिलाच्या निकालानंतर अंतीम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याच दिवशी अपिल नसेल त्याठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत राहणार आहे. तर अपिल असलेल्या ठिकाणी दि. 1 जानेवारीपर्यंत माघारीची मुदत राहणार आहे. दि.7 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे. तर 8 जानेवारी रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. दि. 10 जानेवारी रोजी निवडून आलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.