नंदुरबार । पुर्व वैमनस्यातून महिलेचे घर जाळून 5 लाख रुपयांचे नुकसान करणार्‍या तिघा आरोपींना पाच वर्षे सश्रम कारावसाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी दमणीबाई देवला पाडवी (वय 45, रा. उंबरापाणीपाडा ता.अक्कलकुवा) या सन 2003 पासून महिला बचत गटाचे सचिव तसेच महिला बचतगट संचलित स्वस्त धान्य दुकान चालवित होत्या. दि.27 फेब्रुवारी 2014 रोजी शिवाजी धनजी पाडवी, सायसिंग शिवाजी पाडवी, सुभाष धनजी पाडवी यांनी फिर्यादी दमणीबाई पाडवी व आहटीबाई यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली होती. त्यामुळे दमणीबाई पाडवी व आहटीबाई या दोघींनी सोबत जावून मोलगी पोस्टेला फिर्याद दिली होती.

याचा राग मनात धरुन शिवाजी धनजी पाडवी, सायसिंग शिवाजी पाडवी, सुभाष धनजी पाडवी यांनी फिर्यादी दमणीबाई पाडवी व तिची मुलगी कुमारी मिना गिमजा वळवी यांना शिवीगाळ केली होती. येथे राहू नका, चालते व्हा, असे सांगून तेव्हाही दोन तीन वेळा लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली होती. नंतर शिवाजी धनजी पाडवी, सायसिंग शिवाजी पाडवी, सुभाष धनजी पाडवी, अशोक सुभाष पाडवी, धनसिंग रूपसिंग वसावे रा. डावचा पाटीलपाडा अश्यांनी काहीएक कारण नसतांना एखाद्या दिवशी तुला मारून टाकु, तुझे घर पेटवुन देवु अशा धमक्या फिर्यादी दमणीबाई पाडवी यांना देत होते. धनसिंग रुपसिंग वसावे याने फिर्यादी हिस दम दिला. जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी दमणीबाई देवला पाडवी हिच्यासमोर धनसिंग रुपसिंग वसावे हा त्याच्या नातेवाईकांना चिथावणी देवून सांगत होता की, जर पोलीस स्टेशनला फिर्याद द्यायला गेली तर तिचे घर पेटवून टाका, अशी धमकी दिली होती.

दि.8 एप्रिल 2014 रोजी रात्री 8 ते 9 वाजेच्या दरम्यान फिर्यादी दमणीबाई देवला पाडवी व तिचे वडील देवला पाडवी, मुलगा गणपत, मुलगी मिना व सुन पानाशीबाई असे जेवण करून झोपलेले असतांना दि.9 एप्रिल 2014 रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास फिर्यादी दमणीबाई देवला पाडवीच्या घराच्या पडवीत बांधलेल्या म्हशीचे पारडू जोरात ओरडले, तसेच बांबु तडाडल्याचा आवाज आला म्हणुन फिर्यादी दमणीबाई व घरात झोपलेले सर्व जागे झाले. फिर्यादी यांच्या घराच्या कुडामातीच्या बांधलेल्या भिंती व कौलासाठी लावलेले छताचे लाकडे व माळा जळतांना फिर्यादी दमणीबाई देवला पाडवी व तिच्या घरच्यांना दिसले. त्यावळेस फिर्यादी व तीचा परिवार जीव वाचवून घराच्या बाहेर पळाले होते. यावेळी घराच्या बाहेर शिवाजी धनसिंग पाडवी, सायसिंग शिवाजी पाडवी, सुभाष धनजी पाडवी, अशोक सुभाष पाडवी, धनसिंग रूपसिंग वसावे रा. डावचा पाटीलपाडा व इतर दोन अनोळखी इसम घरास आग लावून पळतांना दिसले होते.

घरास लागलेली आग विझवण्याकरीता पुरेसे पाणी नसल्याने आग विझवता आली नसल्याने संपूर्ण घर आगीत जळून खाक झाले होते. फिर्यादी व तिच्या घरच्यांनी जोरजोरात आरडाओरड केल्याने गावातील लोक रिना भ्र.आमश्या पाडवी, विज्या विखा पाडवी, जलसिंग वाडया पाडवी, सिपा ओल्या पाडवी, वाडया डुअल्या पाडवी वगैरे लोक दमणीबाई यांच्या घरासमोर आले होते. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आग मोठी असल्याने विझविता आली नाही. त्यात बचतगटाचे रेशन दुकानाची 60 हजार रूपये रोकड, 14 क्विंटल रेशन धान्य व घरात बांधलेली म्हैस असे जळून खाक झाले होते. बचत गटाच्या रेशन दुकानाकरीता कमी पडलेले पैसे पूर्ण करण्याकरीता उसने घेतलेले 50 हजार रूपये व घरात ठेवलेले 1 लाख 10 हजार रुपये रोकड व संसारोपयोगी सामान असे एकुण 5 लाख रूपयांचे नुकसान केले होते. अश्या फिर्यादीवरुन मोलगी पोलीस ठाण्यात भादविक-436, 109, 427, 429, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयातील आरोपी शिवाजी धनजी पाडवी, सायसिंग शिवाजी पाडवी, सुभाष धनजी पाडवी यांना अति जिल्हा सत्र न्यायाधीश पी.बी.नायकवाड शहादा यांनी भा.द.वि.क.436 या कलमान्वये 5 वर्ष सश्रम कारावास व 10 हजार रुपये दंड व भा.द.वि.क.429 मध्ये 3 वर्षे सश्रम कारावास व 5 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

वरील गुन्हयाचा सखोल तपास करुन आरोपीविरुध्द शहादा सेशन न्यायालयात दोषारोपपत्र सहायक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ पालवे यांनी सादर केले होते. तसेच सदर खटल्यात अभियोग पक्षातर्फे सरकारी वकील अ‍ॅड.विनोद गोसावी यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी म्हणुन असई नासिरखाँ पठाण यांनी कामकाज केले.

LEAVE A REPLY

*