Type to search

maharashtra नंदुरबार

नंदुरबार येथे सुरतच्या व्यापार्‍याला लुटणार्‍या चौघांना अटक

Share
नंदुरबार । गुजरात राज्यातील व्यापार्‍याला लुटणार्‍या चौघांना अवघ्या सहा तासाच्या आत नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद करून त्यांच्या ताब्यातून 96 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यातील आनंद जिल्ह्यातील व्यापारी नेरशभाई पुरूषोत्तम वोढ बेलदार हे त्यांच्या दोन सहकार्‍यांसमवेत धुळे येथून काम आटोपून नंदुरबारमार्गे त्यांच्या गावीजात असतांना सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास धुळे चौफुलीजवळ चौघा अज्ञात इसमांनी थांबवून त्यांना दमदाटी करीत 1 लाख 10 हजार रूपये रोख व सॅमसंग कंपनीचा एक मोबाईल जबरीने चोरून नेला. याबाबत नरेशभाई वोढ यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरूध्द गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक संजय पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी तपास सुरू केला. तपास पथकाने धुळे चौफुली परिसर पिंजून काढत संशीयतांचा माग काढला. दरम्यान तपास पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, संशयीत लपून बसलेल्या टेकडीजवळ रात्री 1 वाजेच्या सुमारास छापा टाकण्यात आला. या छाप्यादरम्यान व्यापार्‍याची लुट करून आणलेले पैसे हिस्सेवाटणी करीत असतांना चौघांना रंगेहाथ पकडण्यात आले. यात शेख हमिद रज्जाक रा.गाजीनगर,नंदुरबार,रविंद्र प्रदीप पाडवी रा.अंबिका कॉलनी,नंदुबार, जंगलसिंग धरमसिंग ठाकरे रा.नंदुरबार , सुनिलकुमार सोनवणे या चौघांची चौकशी केली असता व्यापार्‍याची लुट केल्याचे त्यांनी मान्य केले. या चौघांकडून 96 हजार 500 रूपये रोख हस्तगत करण्यात आले. अवघ्या सहा तासाच्या आत व्यापार्‍याची लुट करणार्‍या चौघा गुन्हेगारांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केल्याने पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी तपास पथकाला विशेष रोख बक्षीस जाहीर केले आहे.

पोलीस अधिक्षक संजय पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, पो.कॉ. प्रदीप राजपूत, राकेश मोरे, आनंदा मराठे, अभय राजपूत यांनी कामगिरी केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!