काँग्रेस कमिटीतर्फे आज काळा दिवस

0

नंदुरबार । दि.07 । प्रतिनिधी-दि.8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण होत असल्याने नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने काळा दिवस पाळून जाहीर निषेध करण्यात येणार आहे. यावेळी तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

याबाबत नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नोटाबंदी हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा असून त्याचे दुष्परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागत आहेत.

या निर्णयानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत पैसे काढण्यासाठी बँकेच्या बाहेर रांगेत उभे असतांना देशभरातून दिडशे लोकांचा मृत्यू झाला. दहशतवादही संपलेला नाही. काश्मिर खोर्‍यात आपल्या सैनिकांवर दगडफेक सुरू आहेत.

आजपर्यंत काळा पैसा परदेशातून आपल्या देशात आला नाही. प्रत्येकाच्या बँकखात्यात 15 लाख रूपये येणार होते, त्याचे काय झाले ते सरकार सांगायला तयार नाही.

एवढे काही झालेले असतांनाही सरकार मात्र भारतीय अर्थव्यवस्थेवर केलेल्या या सर्जिकल स्ट्राईकला फार मोठी उपलब्धी असल्याचे भासवत आहे.

काळ्या पैशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नोटाबंदी केली होती, असे सांगण्यात आले असले तरी वास्तवात केवळ सोळा लाख कोटी रूपयेच बँकांकडे जमा न होता फक्त 15.28 लाख कोटी रुपयेच बँकांकडे परत आलेले आहेत.

या घटनेला 8 नोव्हेंबर 2017 रोजी एक वर्ष पूर्ण होत असल्याने त्याचा नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने काळा दिवस पाळून जाहीर निषेध करण्यात येणार आहे.

यात नंदुरबार शहरातील प्रमुख रस्त्यावरून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. यात आ.सुरूपसिंग नाईक, माजी मंत्री माणिकराव गावीत, आ.अ‍ॅड.के.सी. पाडवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी, जि.प. अध्यक्षा सौ.रजनी नाईक, पं.स.सभापती श्रीमती रंजनाताई नाईक, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के.पाटील, कृऊबा समिती सभापती भरत पटेल, माजी जि.प.अध्यक्ष रमेश गावीत, भरत गावीत, नंदुरबार शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष रविंद्र मराठे आदींच्या उपस्थितीत रॅली काढून तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य, पं.स. सदस्य, नगरसेवक, विविध सहकारी संस्थाचे पदाधिकारी, मार्केट कमिटीचे पदाधिकारी, शेतकरी सहकारी संघाचे पदाधिकारी, विविध सेलचे पदाधिकारी, युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कॉग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी दि.8 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता आमदार कार्यालय येथे एकत्र येण्याचे अवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*