नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गिरीश पाटील यांचे निधन

0
नंदुरबार । नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक व नुकतेच नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्यात बदली होऊन गेलेले पोलीस निरीक्षक गिरीश पाटील यांचे अल्पशः आजाराने नाशिक येथील अपोलो रुग्णालयात निधन झाले.

पंधरा वर्षापुर्वी नंदुरबार पोलीस निरीक्षक गिरीश पाटील हे नंदुरबार जिल्हयात पोलीस सेवेनिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी नंदुरबार वाहतूक पोलीस निरीक्षक म्हणून चोख कामगिरी पार पाडली होती. समविषम पार्किंग, एकेरी वाहतूकीची नियमावली त्यांच्याच काळात झाली होती. त्यानंतर पुन्हा गेल्या चार वर्षापासून ते नंदुरबार जिल्हयात सेवा देत होते. मूळचे मारवड ता.अमळनेर येथील रहिवासी पोलीस निरीक्षक गिरीश पाटील नंदुरबार येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी यशस्वी कामगिरी केली होती.

त्यानंतर त्यांची बदली शहर वाहतूक शाखेत करण्यात आले. चार महिन्यांपुर्वीच त्यांची नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यात ज्या ज्या वेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता, त्याप्रसंगी गिरीश पाटील सर्वप्रथम फौजफाट्यासह पोहोचत होते. नंदुरबारात झालेल्या दंगलीत त्यांनी दंगेखोरांना हुसकावून लावले होते. त्यात ते जखमीही झाले होते. आता पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बदल्यांमध्ये त्यांची नाशिक ग्रामीणला बदली झाली.

परंतु बदलीच्या चार दिवसापुर्वीच त्यांची नियुक्ती नियंत्रण कक्षात करण्यात आली होती. त्यामुळे ते कमालीचे अस्वस्थ होते. दरम्यान त्यांना न्युमोनिया झाल्याने त्यांना नाशिक येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. न्युमोनियामुळे त्यांच्या फुप्फुसात संसर्ग होवून फुप्फुस निकामी झाले होते. त्यामुळे काही दिवसांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने पोलीस वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर मारवड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

*