Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारसारंगखेडा यात्रेत दोन हजार घोडे दाखल

सारंगखेडा यात्रेत दोन हजार घोडे दाखल

चेतक फेस्टिव्हलची तयारी पूर्णत्वाकडे : महिनाभर चालणार अश्व बाजार

सारंगखेडा  – 

देशातील प्रसिद्ध व तीन राज्यांच्या सीमेवर वसलेल्या सारंगखेडा येथील एकमुखी दत्तप्रभुंचा  यात्रोत्सव व आंतरराष्ट्रीय दर्जाचा चेतक फेस्टिव्हल पाहण्यासाठी येणार्‍या भाविक व पर्यटकांसाठी सुरक्षेची विशेष काळजी घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेर्‍यासह गुन्हेगार शोधपथकही कार्यान्वित करण्यात येणार आहे. यात्रेत आतापर्यंत दोन हजारावर घोडे दाखल झाले आहेत. ं

- Advertisement -

त्रिशतकी परंपरा असलेल्या येथील एकमुखी दत्तप्रभुंचा यात्रोत्सव आणि त्या अनुषंगाने भरणार्‍या अश्वबाजाराला चेतक फेस्टिव्हलच्या रूपाने नवा आयाम दिला आहे.

खानदेशच्या दृष्टीने ही मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. गेल्या वर्षी या उत्सवाला वीस लाखांहून अधिक भाविक व पर्यटकांनी भेट दिली होती. येथील अश्व बाजार महिनाभर चालतो.

देशाच्या कानाकोपर्‍यातून व्यापारी येथे येतात. त्यातून पाच कोटीहून अधिक उलाढाल होत असते . यात्रोत्सवातील उलाढाल, वाढलेली पर्यटकांची गर्दी लक्षात घेता, सुरक्षिततेची जबाबदारी पोलिसांवर असते. गेल्यावर्षी वाहतूकीची कोंडी झाली होती.

त्यादृष्टीने यंदा मोठया प्रमाणावर वाहतूक पोलीस व यात्रोत्सवात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सारंगखेडा पोलीस ठाण्यातून यासाठी जादा कर्मचार्‍यांची मागणी केली होती .

मोक्याच्या ठिकाणी कॅमेेरे

यात्रेच्या गर्दीच्या ठिकाणासह चेतक फेस्टिव्हल व टेन्ट सिटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यानुसार नजर ठेवण्यासाठी दोन कंट्रोल रूम ठेवण्यात येणार आहे. यासाठी महिला पोलीस कर्मचारी काम पाहतील. गेल्यावर्षी यात्रोत्सवातच मोठया प्रमाणावर चोरीचे प्रमाण वाढले होते. यंदा त्याबाबत दक्षता घेण्यात येणार आहे.

2 हजार घोडे दाखल

सारंगखेडा यात्रेत आतापर्यंत एकूण 2 हजार घोडे दाखल झाले आहेत. त्यापैकी आजअखेर 14 घोडयांची विक्री झाली आहे. या घोडयांची किमत 9 लाख 85 हजार रुपये आहे.

आतापर्यंत जास्तीत जास्त 2 लाख 55 हजार रुपये किमतीचा घोडा विक्री झाला आहे. बास बरेली (उत्तर प्रदेश) येथील मोहम्मद लईक मोहम्मद यांनी हा घोडा कोल्हापूर येथील संतोष नाभिराज भोकरे  यांना विक्री केला आहे.

पोलीस दलाचे पथक

यात्रेत तीन राज्यांसह अन्य राज्यांतूनही भाविक येतात. त्यात काही गुन्हेगार असतात. त्या संदर्भात काळजी आणि शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस दलातील पथक कार्यान्वित करण्यात येणार आहे.

मुंबई, नंदुरबार, धुळे येथून काही स्वयंसेवी संस्था, संघटनांचे स्वयंसेवकही येथे येतील. परिसरातील पोलीस पाटील यांच्या मदतीला राहतील. यात्रेतील अग्नीशमन दलाचे बंब, पथक यात्रास्थळी असेल, अन्य पालिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत .

भाविकांच्या सुरक्षेसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार सुरक्षेचे सर्व उपाय योजण्यात येत आहेत , कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रयत्नशील आहेत . भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी केले आहे.

सारंगखेडा यात्रेत दहा अधिकारी, 80 कर्मचारी, 90 महिला कर्मचारी, 80 होमगार्ड, एक श्वानपथक, एक गुन्हेगार शोध पथक कार्यान्वित करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या