Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedनंदुरबार : शुक्रवारपासून जिल्ह्यांतर्गत बससेवा व सर्व दुकाने सुरु होणार

नंदुरबार : शुक्रवारपासून जिल्ह्यांतर्गत बससेवा व सर्व दुकाने सुरु होणार

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचे आदेश

नंदुरबार  –

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात जिल्ह्यात एकही कोविड संसर्ग असलेला रुग्ण नसल्याने 22 मे पासून जिल्ह्यांतर्गत 50 टक्के प्रवासी क्षमतेने बससेवा सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. ग्रामीण भागातील जनतेला या सुविधेचा लाभ होणार आहे.

- Advertisement -

आंतरजिल्हा बससेवेबाबत शासनाकडून सूचना आल्यानंतर त्यानुसार स्वतंत्र आदेश काढण्यात येतील. औषधांची दुकाने आणि खाजगी रुग्णालये सुरू राहतील. टॅक्सी, कॅब आणि रिक्शा सुरू राहतील, तथापि केवळ वाहनचालक आणि इतर दोन प्रवासी नेण्यास अनुमती राहील. चारचाकी वाहनाने देखील वाहनचालक व इतर दोन प्रवाशांना अनुमती असेल. दुचाकी वाहनावर केवळ चालकाला (एका व्यक्तीस) अनुमती असेल. सर्व प्रकारच्या मालवाहतूक करता येईल. शहरी आणि ग्रामीण भागातील उद्योग सुरू करण्यासदेखील अनुमती असेल.

शहरातील सर्व दुकाने, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, जीवनावश्यक वस्तूंसाठीची ई-कॉमर्स सेवा, खाजगी कार्यालये, शेती संदर्भातील कामे, बँक, कुरीअर आणि डाक सेवा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, घरपोच सेवा देणारे हॉटेल्स, उपनिबंधक आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालये सुरू ठेवण्यास अनुमती असेल. शासकीय कार्यालयात 100 टक्के उपस्थिती ठेवता येईल. प्रेक्षकाशिवाय वैयक्तिक व्यायामासाठी क्रीडांगणे सुरू ठेवण्यासही अनुमती राहील. मात्र समुह किंवा गट यांना अनुमती नसेल, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल.

सर्व प्रकारची दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू राहतील. शासकीय प्राधिकरणाकडून देण्यात आलेल्या अनुज्ञतेसाठी स्वतंत्र परवानगी घ्यावी लागणार नाही. दुकान मालकांनी करोनाविषयक सर्व सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा दिलेली मान्यता रद्द करण्यात येईल. हॉटेलमधील पार्सल सेवेलाच केवळ अनुमती असेल.

रेल्वे, आंतरराज्य बससेवा, आंतरजिल्हा बससेवा, शॉपींग मॉल्स, चित्रपटगृहे, प्रार्थनास्थळे, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, बार आणि ऑडीटोरीअम, असेंम्ब्ली हॉल पूर्वीप्रमाणे बंद राहतील.

जिल्ह्यात घेण्यात येणाऱ्या सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, ऊरूस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, आठवडे बाजार भरण्यास बंदी असणार आहे. धार्मिक कारणासाठी एकत्र होण्यासही बंदी असेल.

जिल्ह्यात सायंकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कोणत्याही नागरिकास आवश्यक बाब वगळता इतर कारणासाठी बाहेर फिरण्यास बंदी असेल. ज्येष्ठ नागरिक, 10 वर्षाखालील मुले आणि गर्भवती महिलांना बाहेर फिरण्यास अनुमती राहणार नाही. केवळ आरोग्यविषयक कारणांसाठी त्यांना बाहेर निघता येईल. प्रतिबंधीत क्षेत्रात केव6ळ मालवाहतूक, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सार्वजनिक ठिकाणी वावरतांना नागरिकांनी चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल वापरणे बंधनकारक आहे. एका ठिकाणी 5 पेक्षा अधिक नागरिक जमा होणार नाही याची जबाबदारी संबंधित व्यवस्थापकाची असेल. लग्नामध्ये 50 पेक्षा अधिक व्यक्ती सहभागी होणार नाही व करोनाविषयक सर्व नियमांचे पालन आवश्यक आहे. अंत्ययात्रेत 50 पेक्षा जास्त व्यक्ती सहभागी असणार नाहीत व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल.

सार्वजनिक थुंकणे दंडनीय अपराध मानण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी दारु, पान, तंबाखूचे सेवन करण्यावर बंदी असेल. सर्व दुकानांवर प्रत्येक व्यक्तीत 6 फुटाचे अंतर ठेवण्यात येईल व एकावेळी 5 ग्राहक नसतील. या व्यतिरिक्त शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या सुचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. प्रतिबंधीत क्षेत्रात केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मुभा देण्यात आलेल्या आस्थापनाच केवळ सुरू राहतील, असे आदेशात नमूद केले आहे. आदेशाचा भंग करणाऱ्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल. हा आदेश 22 मे 2020 पासून अंमलात येणार आहे.

मोबाईल ॲप विकसीत करण्यासाठी आवाहन

स्थानिक गरजू व्यक्तींना जिल्ह्यातील विविध कामांवर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनातर्फे मोबाईल ॲप विकसीत करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात असे ॲप विकसीत करू इच्छिणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष (02564-210006) येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या