Type to search

Breaking News नंदुरबार

जिवंतपणीच आई-वडिलांची कदर करावी : भारती

Share

 शहादा  – 

रस्त्यावरची जर्शी गाय व मित्राची आई हिला आपण आपसुक विचारतो व श्रध्देने पाय पडतो. पण ज्या दिवशी गोठ्यातल्या गायीची पुजा व घरातील आईची विचारणा केली जाईल त्यादिवशी भारत देशातून वृध्दाश्रम नाहीसे होतील. सुकलेल्या नारळाची दुकानात पाच रुपये किंमत असते तर ओल्या नारळाची पंधरा रुपये असते.

त्याप्रमाणे घरात आई वडिल असतांना व नसतांना असते. नारळातील पाणी ही आईसमान आहे तर खोबरे हे बापासमान असते. यासाठी जिवंतपणीच आई बापाची कदर करावी, असे प्रतिपादन अविनाश अर्जुन भारती यांनी कै. विश्राम काका व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना केले.

येथील शेठ व्ही.के.शहा विद्यालयात गेल्या नऊ वर्षापासून व्याख्यानमाला सुरु आहे. दरवर्षी वेगवेगळ्या व्याख्यात्यांना बोलावून तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. शहादेकरांसाठी एक बौद्धिक व विचारांची पर्वणीच या माध्यमातून मिळत असते. ते पुढे म्हणाले की मुलाला जन्म देण्यासाठी ज्या आईने मुलाला नऊ महिने नऊ दिवस ओझे झेलले. त्याला त्रास होवू नये म्हणून जेवणाची वेळ बदलली, तो पोरगा आई वडिलांना पोरकाच कसा होतो? हा प्रश्न उपस्थित श्रोत्यांना विचारुन सभामंडप भावूक करुन टाकले.

मायबापाने माझ्यासाठी काय केले, यापेक्षा आपण आईबापांसाठी काय करतो हा प्रश्न आधी स्वतःला विचारला पाहिजे. आजच्या ऑनलाईन जमान्यामध्ये आपण ऑफलाइन असलेल्या माय बापास अडगळीत टाकतो, ही भारताची संस्कृती नाही. भारत देश हा संस्कृतीसाठी सर्व देशावर अधिराज्य करतो आहे.

आपण मातृदिन मनवतो. आई व वडिलांसाठी स्पेशल दिवस किंवा वेगळा दिवस मनविण्याची भारतीय संस्कृती नाही. आई बापाने जन्म दिला त्यासाठी वेगळा दिवस कश्यासाठी?  प्रत्येक दिवस हा आई वडिलांसाठी समर्पित आहेत. मातृ देवो भव पितृ देवो भव ही परंपरा भारताची आहे. सावत्र आईची इच्छा व वडिलांचा शब्द प्रमाण मानत रामायण झाले. रामायणातील वनवास सांगितला नाही तर रामायणच शिल्लक राहाणार नाही.

म्हणून आई वडिलांची सेवा हीच इश्वर सेवा माना. एकदा देवळात गेला नाही तरी चालेल पण आई वडिलांचा मान सन्मान व आदर विसरु नका. जोपर्यंत भारतातून वृध्दाश्रम जात नाही व माझ्या जिवात जिव आहे तोपर्यंत हे काम मी करतच राहिन असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला धनश्री अमोल शिंदे या इयत्ता 7 वी च्या विद्यार्थिनीने बाप या विषयावर एकपात्री प्रयोग सादर करुन उपस्थितांचे मन जिंकले. सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन उपमुख्याध्यापक संजय भोई यांनी केले.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!