कवळीथ व सुसरी बंधार्‍यांचे पुनरुज्जीवन

0
शहादा । दि.26 । ता.प्र.-तालुक्यातील कवळीथ व सुसरी येथील बंधार्‍यातील गाळ काढण्याचे काम आर्ट ऑफ लिव्हींगच्या माध्यमातून 35 दिवसांत पुर्ण करण्यात आले आहे.
त्यामुळे हे दोन्ही कालवे पुनरुज्जीवीत झाले असून दोन्ही कालव्यातील एकूण 56 कि.मी.लांबीच्या गाळ काढण्यात आला आहे.
कवळीथ व सुसरी बंधार्‍यातून निघणारे कालवे अनुक्रमे 26.67 कि.मी. व 29.1 कि.मी. च्या कामाची पाहणी जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, शहाद्याचे तहसीलदार मनोज खैरनार, नायब तहसीलदार देवरे यांनी केली.
अनेक वर्षांपासून रखडलेली, अपूर्णावस्थेतील सदर दोन्ही कामे महाराष्ट्र शासन जलयुक्त शिवार अभियान, जेएनपीटी व आर्ट ऑफ लिव्हिग, शहादा यांच्या सहकार्याने फक्त 35 दिवसांत उत्कृष्टरित्या पुर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी प्रशंसा केली.
यापुढेही आर्ट ऑफ लिव्हिंगने पुढाकार घेऊन जल जागृती अभियान, जल संधारण, झाडे लावणे व अशी अनेक सामाजिक कामे करत राहण्यासाठी आवाहन केले.
याप्रसंगी आर्ट ऑफ लिव्हिंगचे किशोर पाटील, हरीश पाटील, सुरेखा पाटील, प्रा.ईश्वर पाटील, गणेश पाटील, संभू पाटील आदी उपस्थित होते.

आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेमार्फत श्री श्री रविशंकरजी हे भारतभर जलजागृती अभियान राबवित आहे. संस्थेमार्फत नदी, कालवे, नाले, तलाव, धरण यामधील काळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात होत असून पाणी साठविण्यासाठी, जास्तीत जास्त पाणी जमिनीत जिरविण्यासाठीचे कार्य सुरू आहे.

शहादा तालुक्यातील कवळीथ वळण बंधार्‍यातून निघणारे कालवे ब्रिटीशकालीन असून जुना कालवा, मुख्य कालवा व उपकालवा डी-10 हे एकूण 26.67 कि.मी. आहे. सदर कालवा कवळीथ, सोनवल त.ह., आसुस, टेंभली, लोणखेडा, पुरुषोत्तमनगर, डोंगरगांव, कौठळ त.श., सोनवद त.श., मोहिदे त.श. ते वरुळ-कानडी पर्यंत आहे.

या कालव्यात येणार्‍या पाण्याने 5 मोठे तलाव भरले जावून करोडो लिटर पाणी जमिनीत मुरते. बर्‍याच वर्षांपासून कालव्यात गाळ साचल्यामुळे जेमतेमच मोहिदा गावापर्यंत पाणी पोहोचत होते.

त्यामुळे काही गावांच्या पिण्याच्या पाण्याचा व शेती सिंचनाचा प्रश्न गंभीर झालेला होता. कवळीथ वळण बंधार्‍यातून निघणार्‍या कालव्यावर एकूण 5600 हेक्टर पेक्षा जास्त लाभक्षेत्र असून गेल्या 25-27 वर्षांत कालव्याच्या शेवटपर्यंत पाणी पोहोचलेच नव्हते.

कारण बर्‍याच ठिकाणी कालवा जमिन स्तरापर्यंत गाळाने, झाडाझुडपांनी भरलेला होता. तसेच सुसरी वळण बंधार्‍यातून निघणारा कालवा 1952 साली तयार करण्यात आला.

त्यात 8.50 कि.मी. लांबीचा मुख्य कालवा असून त्याच्या 4 वितरीका असा एकूण 19.80 कि.मी. लांबीचा आहेत. या कालव्याचा विसर्ग 40 क्युसेक्स इतका असून त्याचे लाभक्षेत्र 2575 हेक्टर आहे. सुसरी नदीचा प्रवाह सिंचनासाठी कमी पडू लागल्यामुळे सुसरी नदीच्या डाव्या बाजुस गोमाई नदीवर एक वळण बंधारा बांधण्यात आलेला असून या बंधार्‍याचे पाणी कालव्याद्वारे सुसरी वळण बंधार्‍यात सोडण्यात आलेले आहे.

गोमाई वळण बंधार्‍यातून 0.80 कि.मी. लांबीचा कालवा निघून यातून 70 क्युसेक्स इतका विसर्ग आहे. मागील 40-45 वर्षांपासून सदर कालवा गाळाने भरुन त्याची क्षमता खुपच कमी झाली आणि पुढे होळ-मोहिदा, तिखोरा, पिंगाणे, धुरखेडा, कलसाडी, भादे, काथर्दे या गावांपर्यंत पाणी पोहोचणेच बंद झाले होते. त्यामुळे या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा व मुख्यत्वे शेती सिंचनाचा प्रश्न गंभीर झालेला होता.

जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे शहादा येथील किशोर पाटील, हरीश पाटील व स्वयंसेवक यांचेवर कवळीथ व सुसरी वळण बंधार्‍याचे दोन्ही कालवे पुनरुज्जीवीत करण्याची जबाबदारी सोपवली.

त्याअनुषंगाने दोन्ही कामे युद्धपातळीवर हाती घेवून फक्त 35 दिवसांत ही कामे पुर्ण करण्यात आले. दोन्ही कालव्यातील एकूण 56 कि.मी.लांबीच्या गाळ काढण्यात आला व पाणी शेवटच्या टोकापर्यंत जाण्यासाठी सुसरी बंधार्‍यावर 30 मी.लांब व 1 मी. उंच काँक्रीट भिंतीचे बांधकाम पूर्ण केले.

तसेच 4 नवीन गेटही बसविण्याचे काम पूर्ण झाले असून अजून नवीन 4 गेट बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. येत्या 2 दिवसात त्याचेही काम पुर्ण होईल.

परिसरातील शेतकरी म्हणतात की, आमच्या आजोबांनी पूर्वीच्या काळात जसे कालवे पाहिले होते तसेच कालवे आता आर्ट ऑफ लिव्हिंगने केलेल्या कामामुळे पाहावयास मिळत आहेत.

आजतागायत झाले नाही असे काम आता झालेले असून कामाची गुणवत्ताही खूप चांगली असल्याची लोकांची मान्यता असून श्री श्री रविशंकरजी यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेने केलेल्या कामाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत असून संस्थेचे व स्वयंसेवकांचे शेतकरी व गावकरी आभार व्यक्त करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

*