ग्रामीण भागातील प्रयोगशाळेमुळे तंत्रज्ञान समजण्यास मदत !

0
नंदुरबार । दि.21 । प्रतिनिधी-ग्रामीण भागातील रोपनिर्मिती प्रयोगशाळा लहान असली तरी आगामी काळात एक नव्हे तर अनेक प्रयोग शाळा पुढे येवू शकतात त्यामुळे शेतकर्‍यांना विविध पर्याय उपलब्ध होवून तंत्रज्ञान समजण्यास मदत होऊ शकेल, असे प्रतिपादन परमाणु ऊर्जा आयोगाचे सदस्य, अध्यक्ष, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग, अध्यक्ष भारतीय राष्ट्रीय विज्ञान, अध्यक्ष, माहिती तंत्रज्ञान आणि अंदाज व मूल्यांकन परिषद डॉ.अनिल काकोडकर यांनी केले आहे.
अणुऊर्जा विभाग भारत सरकारच्या सामाजिक उपक्रम नुसार आकृती टेक पॅक कार्यक्रमांतर्गत केळी उतीसंवर्धित रोपनिर्मिती प्रयोग शाळेचा शुभारंभ कार्यक्रम डॉ.काकोडकर यांच्या हस्ते आज करणखेडा ता.नंदुरबार येथे झाले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, महाराष्ट्र राज्याचे राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग सदस्य डॉ.गजानन डांगे, कृषि शास्त्रज्ञ डॉ.विश्वास कुळकर्णी, सौ.स्मिता मुळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुभाष नागरे, आत्माचे प्रकल्प संचालक मधुकर पन्हाळे, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी उमाकांत पाटील, हेडगेवार सेवा समिती अध्यक्ष कृष्णदास पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ राजेंद्र दहातोंडे आदि उपस्थित होते.

डॉ.काकोडकर म्हणाले, तंत्रज्ञानाविषयी जाणीव भोवतालच्या परिसरात वाढविण्यासाठी अशा प्रयोगशाळांचा उपयोग होऊ शकतो.

कुठलेही तंत्रज्ञान प्रयोगशाळेत विकसित झाल्यानंतर शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी अनेक बाबी पार पाडाव्या लागतात. यासाठी एक मध्यस्थी संस्था असणे आवश्यक असून या भागात काम करणार्‍या स्वयंसेवी संस्थांनी मध्यस्थची भुमिका बजवावी जेणेकरुन शेतकर्‍यांना तंत्रज्ञान समजण्यास मदत होवुन त्यांचा फायदा होईल असे त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी बोलतांना म्हणाले की, शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग केला तर उत्पनात वाढू होऊ शकते. जिल्हा प्रशासन नेहमी शेतकर्‍यांशी पाठीशी असून नंदुरबार आदिवासी बहुल जिल्हा शेती उत्पादनात प्रगतशिल राहील याबाबत आपण सर्व कट्टीबध्द राहूया. डॉ.विश्वास पाटील यांनी लॅबची उभारणी आणि तांत्रिक माहिती दिली. तसेच डॉ.गजानन डांगे व सौ.स्मिता मुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी डॉ.अनिल काकोडकर यांनी केळी उतीसंवर्धित रोपनिर्मिती प्रयोगशाळेची पाहणी करुन अंकुर बायोटेकचे यशपाल पटेल व राधेय फायटोटेकचे स्वप्निल पाटील यांच्याकडून माहिती जाणून घेतली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन आर.एम. पाटील यांनी मानले. कार्यक्रमास परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

*