भरधाव वेगातील टँकरच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू

भरधाव वेगातील टँकरच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

प्रकाशा ता.शहादा येथील बर्‍हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर भरधाव वेगातील टँकरचे नियंत्रण सुटल्याने रामनगर येथे घरासमोरील अंगण झाडत असलेल्या युवतीला धडक दिल्याने तीचा जागीच मृत्यू झाला. तसेच टँकर पलटून जवळच असलेल्या शॉपींग कॉम्लेक्सवर धडकल्याने सुमारे 5 लाखांचे नुकसान झाले.

याबाबत रतिलाल चापा भिल (वय 50) यांनी प्रकाशा येथे दूरक्षेत्रात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते पत्नी विमलबाई, मुलगा कैलास, मुलगी तोरण व आई असे एकत्र रामनगर येथे राहतात.

आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी विमलबाई, मुलगा कैलास, व आई घरात होते व रतिलाल भिल हे अंगणात उभे राहून दात घासत असताना त्यांची मुलगी तोरण ही घरासमोर अंगण झाडत होती.

यावेळी शहाद्याकडून येणार्‍या एका टँकरचे नियंत्रण सुटल्याने विरुद्ध दिशेला येऊन रोडचा उजव्या बाजूला अंगणासमोर साफसफाई करत असलेल्या त्यांची मुलगी तोरण भिल (वय 20) हिला धडक दिली. कंटेनरचे पुढील चाक तिच्या डोक्यावरून चालून गेले. त्यात तीचा जागीच मृत्यू झाला.

सदर टँकरने धडक दिल्यानंतर भरधाव वेगात असल्याने 100 फुटावरील उजव्या बाजूला असलेल्या राजेंद्र जगन्नाथ लोहार यांच्या वेल्डिंगचा चार दुकानांवर धडकले. त्यात बाहेर ठेवलेली टपरी देखील दबली गेली. त्यात त्यांचे सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले आहे.कंटेनर (क्रमांक एम.एच. 17/ ए.जी. 0029) हे शिरपूरहुन नवापूर येथे मोलाइसेस भरण्यासाठी जात होते. त्यावेळी ही घटना घडली.

घटनेची माहिती वस्तीसह गावात वार्‍यासारखी पसरली. त्यामुळे पं.स.सदस्य जंग्या भिल, सरपंच सुदाम ठाकरे, शिवसेना प्रकाशा गटप्रमुख राजेंद्र लोहार, शांतीलाल ठाकरे आदींसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. चालक विशाल तुकाराम तिरमले वय वर्ष 20 राहणार विखुरले ता.शिंदखेडा याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध शहादा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास हवालदार सुनील पाडवी, रामा वळवी,विकास शिरसाठ, अजित नागलोद करीत आहे.

गंभीर जखमी अपघातग्रस्त युवतीला ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्र प्रकाशा येथे आणले असता डॉ.अजय पावरा यांनी मयत घोषित केले. त्यांनीच शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

सदर टँकरचे इन्शुरन्स नाही व चालकाकडे अवजड वाहन चालकाचा परवानादेखील नाही. त्यामुळे या वाहन चालकाचे मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com